अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2022 :- धनादेशाचा अनादर केल्याप्रकरणी न्यायालयाने शिक्षा ठोठावलेला फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.
लक्ष्मीनारायण सहकारी नागरी पतसंस्थेचा कर्जदार दीपक भारत सावेकर (रा. आनंदीबाजार, नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

त्याला न्यायालयाने एक वर्ष कारावास आणि आठ लाख रुपये पतसंस्थेला भरण्याचा आदेश दिला होता. तो शिक्षा लागल्यापासून फरार होता. दीपक सावेकर याने लक्ष्मीनारायण सहकारी नागरी पतसंस्थेतून कर्ज घेतले होते.
या कर्जाच्या परतफेडीसाठी बँकेचे धनादेश दिले होते. त्यांच्या बँक खात्यात पुरेशी रक्कम शिल्लक नसल्याने या धनादेशाचा अनादर झाला. पतसंस्थेने एन. आय. कायद्याच्या कलम 138 अन्वये न्यायालयात 2018 मध्ये खटला दाखल केला होता.
अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी डी. आर. दंडे यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. दीपक सावेकर याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने एक वर्ष कारावास, आठ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला होता.
सावेकर हा शिक्षा लागल्यापासून फरार होता. न्यायालयाने आरोपीस अजामीनपात्र वॉरंट काढले होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने त्यास अटक केली. त्यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे.