अहमदनगर Live24 टीम, 04 एप्रिल 2022 Ahmednagar News : वाहन चालकाला शिवीगाळ, मारहाण, दमदाटी करत त्याच्याकडून पैसे घेणार्या आरोपीविरूध्द येथील कोतवाली पोलीस ठाण्यात 7 जानेवारी 2022 रोजी दरोडाचा गुन्हा दाखल करण्यात आला होतो.
या गुन्ह्यातील पाच आरोपींविरूध्द येथील जिल्हा सत्र न्यायालयात 102 पानी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. रोहित नामदेव लंगोटे (वय 28), निलेश सुनील पेडुळकर (वय 26), अभिषेक अशोक शेलार (वय 19, तिघे रा. भिंगार), ऋषिकेश अनिल डाडर (वय 19) व सिध्दार्थ संतोष निमसे (वय 21, दोघे रा. कायनेटीक चौक, अहमदनगर) अशी दोषारोपपत्र दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

दरम्यान या गुन्ह्यात आणखी दोन आरोपी असून ते अल्पवयीन आहे. त्याच्याविरूध्द प्रधान न्यायदंडाधिकारी Pबाल न्यायालय येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कायनेटीक चौकात ही घटना घडली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक महाजन यांनी केला. त्यांना पोलीस अंमलदार याकुब सय्यद यांनी मदत केली.
त्यांनी आरोपीविरूध्द भक्कम पुरावे गोळा केले. त्याद्वारे 102 पानी दोषारोपपत्र तयार करून ते न्यायालयात दाखल करण्यात आले.
पोलिसांनी आरोपींकडून दोन दुचाकी, रोख रक्कम, मोबाईल आदी मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान दोन विधीसंघर्षीत बालकांचा आरोपीमध्ये समावेश असून त्यांच्यावर देखील दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.