Ahmednagar News : मुंबईहून नगरला सफरचंद घेवून येणाऱ्या पिकअपचा टायर फुटल्याने पिकअप पलटी होऊन चालक गंभीर जखमी झाल्याची घटना नगर- पुणे महामार्गावर कामरगाव (ता. नगर) घाटात सोमवारी (दि. २६) पहाटे घडली.
या अपघातात सफरचंदाचे सर्व कॅरेट रस्त्यावर पडून सुमारे दोन लाखांच्यापेक्षा जास्त सफरचंदाचे व पिकअप चे मोठे नुकसान झाले.मुंबईहून सफरचंदाचे कॅरेट भरून एक पिकअप (क्र. एमएच २५ एजे ३३०७) नगरला येत होता.

सोमवारी (दि.२६) पहाटे ३ ते ४ च्या दरम्यान कामरगाव घाटात हा पिकअप आला असता, त्याचा टायर फुटल्याने तो पलटी होऊन लांबपर्यंत घसरत गेला. त्यामुळे त्यातील सफरचंदाचे सर्व कॅरेट रस्त्यावर पडून सफरचंदांचा चेंदामेंदा होऊन नुकसान झाले.
तर या दुर्घटनेत पिकअप चालक अनिकेत गोसावी (रा. करमाळा, सोलापूर) हा गंभीर जखमी झाला. त्यास उपचारासाठी नगरच्या खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच सिद्धांत आंधळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला काढत वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली.
ट्रामा सेंटर उभारणीचे ‘घोडे’ अडलेलेच नगर पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. या अपघातग्रस्तांना तातडीने उपचार मिळणे गरजेचे असून, त्या साठी चास कामरगाव शिवारात शासकीय ट्रामा सेंटर उभारणे आवश्यक आहे.
यासाठी सिद्धांत आंधळे यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अधिकाऱ्यांना भेटून याबाबत शासन दरबारी प्रस्ताव पाठविण्यासाठी साकडे घातले. तसेच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत, याकडे त्यांचे लक्ष वेधले होते.
मुख्यमंत्र्यांनी शासकीय यंत्रणांना प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. मात्र अजूनही या शासकीय ट्रामा सेंटर उभारणीचे ‘घोडे’ अडलेलेच आहे, याबाबत सिद्धांत आंधळे यांनी तीव्र संताप व्यक्त करत शासकीय लालफितीच्या या कारभारामुळे अपघात ग्रस्तांना तातडीने उपचार मिळत नाहीत.
त्यामुळे अनेकांना रस्त्यातच आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. शासकीय यंत्रणेला अजून किती जणांचे बळी हवे आहेत? असा संतप्त सवालही आंधळे यांनी केला आहे.