काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील आठवडे बाजार राज्यभर प्रसिद्ध आहे. अनेक शतकांपासून हा बाजार भरत असून, त्यामागे गावातील नागरिकांचे मोठे योगदान आहे. मात्र, श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी बाजार इतरत्र हलवण्याची भाषा केल्याने हा वाद चांगलाच पेटला आहे.
बाजार हलवण्याचा विचार करणाऱ्यांनी प्रत्यक्ष तसे करून दाखवावे, असे खुले आव्हान काष्टीचे सरपंच आणि बाजार समितीचे संचालक साजन पाचपुते यांनी दिले आहे.

सरपंच साजन पाचपुते यांनी या संपूर्ण वादावर रोखठोक भूमिका घेतली आहे. “गेल्या दोन दिवसांपासून अतुल लोखंडे यांना अचानक साक्षात्कार झाला आहे. ते सांगत आहेत की स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या त्रासामुळे बाजार हलविण्याचा निर्णय घ्यावा लागेल. पण, नेमका कोण त्रास देतोय, हे त्यांनी स्पष्ट सांगावे,” असे आव्हान त्यांनी दिले.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक झाल्यानंतर मी तेथील अंदाधुंदी बाहेर काढत आहे, त्यामुळे काही जणांना त्रास होतोय. म्हणूनच माझ्यावरच आरोप केले जात आहेत, असे पाचपुते यांनी स्पष्ट केले.
काष्टीतील आठवडे बाजार शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू आहे. हा बाजार बंद पडला, तर गावातील व्यापारी, दुकानदार आणि शेतकरी यांचे मोठे नुकसान होईल. त्यामुळे ग्रामपंचायत याबाबत ठाम भूमिका घेत आहे.
बाजारात जनावरे खरेदी-विक्री होत असताना बाजार समितीच्या गेटवर बोगस पावती तयार करून लाखोंचा भ्रष्टाचार केला जातो, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
या बेकायदेशीर वसुलीचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे, त्यामुळेच काही पदाधिकाऱ्यांच्या हितसंबंधांना धक्का लागल्याने माझ्या विरोधात षडयंत्र रचले जात आहे, असेही पाचपुते म्हणाले.
“काहीजण मला बदनाम करण्याचे षडयंत्र रचत आहेत. पण, मी डगमगणार नाही. कारण, मी स्व. सदाआण्णा पाचपुते यांचा मुलगा आहे. माझ्या वडिलांनी नेहमी सामान्य जनतेच्या न्यायासाठी लढा दिला. त्यांच्या विचारांवर चालत मीही तालुक्यातील शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवूनच काम करत राहणार आहे,” असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, काष्टी ग्रामपंचायत आठवडे बाजारात बाजार समितीच्या अखत्यारीतील गाय, म्हैस, बैल, शेळी आणि मेंढ्यांसाठी प्रवेश फी आकारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या शुल्क वसुलीला स्थगिती दिली आहे. हा आदेश बुधवारी (३ एप्रिल) देण्यात आला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी दिली.
या वादामुळे काष्टी बाजाराचे भवितव्य काय राहील, हे येत्या काळात स्पष्ट होईल. मात्र, गावकऱ्यांचा ठाम विरोध आणि न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे बाजार हलवण्याच्या हालचालींना मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणात काय नवे ट्विस्ट येतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.