Ahmednagar News : मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला आहे. सागर पिराजी ठोंबे (वय २८, रा.ठोंबे वस्ती, खांडके, ता.नगर) असे मयत युवकाचे नाव आहे. नगर तालुक्यातील खांडके गावातील सागर हा रविवारी (दि.२३) सायंकाळपासून घरातून बेपत्ता होता.
नगरमध्ये नवनागापूर येथे अल्पवयीन मुलांची अर्धनग्न धिंड काढत बेदम मारहाण केल्याची घटना जाती असतानाच सारसनगर येथे एकाला झाडाला बांधून बेदम मारहाण करून बेशुद्ध झालेल्या एकास रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना घडली आहे.
या दोन्ही घटनांमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांना काही तास उलटत नाहीत तोच परत एकदा तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या युवकाचा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, मयत सागर हा अविवाहित होता. तो बिगारी काम करत होता. कामानिमित्त तो कधी कधी २-३ दिवस बाहेर गावी राहत असे त्यामुळे रविवारी (दि. २३) सायंकाळी तो घरी आला नाही.
त्यामुळे तो कामानिमित्त आला नसेल असे समजून त्याच्या कुटुंबीयांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. मात्र तीन दिवसानंतर बुधवारी (दि.२६) सकाळी ठोंबे वस्ती येथील शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला.
सागर याच्या घराकडे जाणारा रस्ता हा विहिरी जवळूनच जात असल्याने तो पाय घसरून विहिरीत पडला असावा आणि पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून तो मयत झाला असावा असा त्याच्या कुटुंबियांचा अंदाज असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस अंमलदार शैलेश सरोदे हे करीत आहेत.