अहिल्यानगर, राहुरी व नेवासा तालुक्याची सीमा इमामपूर घाट परिसरात आहे. या सीमेवर मोठी वनसंपदा पहावयास मिळते. खोसपुरी, गुंजाळे, इमामपूर, पांढरीपुल या हद्दीतील वनसंपदेला गुरुवारी लागलेल्या वणव्यात मोठी हानी पोहोचली आहे. आर्मीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे तर वन विभागाच्या क्षेत्रालाही मोठी हानी बसल्याचे पहावयास मिळाले.
दिवसभर वणवा भडकत होता. रात्री उशिरापर्यंत वणव्याने रौद्ररूप धारण केले होते. अहिल्यानगर, राहुरी, नेवासा वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वणवा विझवण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु वाळलेले गवत व झाडांचा पालापाचोळा यामुळे वणव्याने रौद्ररूप धारण केले त्यातच कडक ऊन यामुळे वणवा विझविण्यासाठी मोठी अडचण येत होती.

औषधी वनस्पती तसेच मोठ्या वृक्षांना देखील वणव्याचा फटका बसला आहे. वन्यप्राणी जीवाच्या आकांताने सैरावैरा धावताना पहावयास मिळाले. यापूर्वी तालुक्यातील गुंडेगाव, अहिल्यानगर व बीड जिल्ह्याच्या हद्दीतील चिचोंडी पाटील परिसर, इमामपूर, बहिरवाडी, गोरक्षनाथ गड, खोसपुरी या गावांसह विविध गावांमध्ये वनसंपदा वणव्यामुळे नष्ट झाली आहे.
चालू वर्षी वणवा लागण्याच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते. वन विभागाने जाळ रेषा केल्या असल्याचे सांगण्यात येत आहे परंतु काही भागात जाळ रेषाच नसल्याचे नागरिक सांगत आहेत. गुरुवारी लागलेल्या वनव्यात राहुरी तालुक्यातील धुमा डोंगर पूर्णपणे जळून खाक झाला आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर आढळून येतो. तसेच आर्मीचे व वनक्षेत्र देखील मोठे आहे. खिरणीचा महादेव हे धार्मिक स्थळ निसर्गाच्या कुशीतच वसलेले आहे. येथे पर्यटकांची देखील मोठी गर्दी होत असते. येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना नेहमीच पण होत असते. याच निसर्गसंपदेला लागलेल्या वणव्यामध्ये मोठी हानी झाल्याने नागरिक देखील परेशान झाले आहेत.
इमामपूर परिसरातील वन्यप्राणी पाण्याच्या शोधात वणवण भटकंती करत असतानाच लागलेल्या वणव्यामुळे दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. इमामपूर परिसरात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून येथील वन्य प्राण्यांसाठी देखील पाण्याची सोय करण्याची गरज आहे.
या परिसरात लागलेल्या वणव्यामुळे हरण, रानडुक्कर, काळवीट, ससा, सरपटणारे साप, सरडा, घोरपड, मोर तसेच विविध जातींचे पक्षी जीवाच्या आकांताने सैरा वैरा धावत होते. वणवा विझवण्यासाठी नगर, राहुरी, नेवासा येथील वनाधिकारी व कर्मचारी सकाळपासूनच प्रयत्न करत होते.