Ahmednagar News : श्रीरामपूर व राहुरी तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या कान्हेगाव ते लाख पुलाची निविदा प्रसिद्ध झाली असून येत्या एक वर्षामध्ये पुलाचे काम होणार असल्याची माहिती खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी दिली आहे.
याबाबत खासदार लोखंडे यांनी पत्रकारांना दिलेली माहिती अशी, श्रीरामपूर व राहुरी तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या व प्रवरा नदीवर बांधण्यात येणाऱ्या कान्हेगाव ते लाख पुलाची निविदा प्रसिद्ध झाली असून या पुलाची मागणी केली का? अशी अनेक वर्ष नागरिकांकडून विचारणा केली जात होती.
गेली ७० वर्षे प्रलंबित असणारा हा प्रश्न खासदार सदाशिवराव लोखंडे यांच्या पाठपुराव्याने अखेर मार्गी लागल्याचे चिन्हे आहेत. श्रीरामपूरकडे अथवा राहुरीकडे ये-जा करणाऱ्या शेतकरी, शाळकरी, विद्यार्थी, नागरिक यांना प्रवरा नदीमुळे मोठ्या अंतरावरून श्रीरामपूर येथे अथवा राहुरी येथे जावे लागत होते.
या पुलामुळे या गावचे हे अंतर सुमारे १५ किलोमीटरने कमी होणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतीमालाला त्यामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये जाऊन अगदी सहजासहजी विक्री करता येणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांची गैरसोय दूर होणार आहे.
या कामासंदर्भात नुकतीच निविदा प्रसिद्ध झालेली आहे. सुमारे एक वर्षांमध्ये हे काम पूर्ण होणार असून ९ कोटी १६ लाख एवढा अंदाजित खर्च या पुलासाठी केला जाणार आहे. याबाबत परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.