किरकोळ वादातून एका व्यक्तीचा मारहाण करून खून केल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी (१३ डिसेंबर) सायंकाळी जामखेडमध्ये बोलें ते जवळा रस्त्यावरील पठाडे वस्तीजवळ हे प्रकरण घडले. सुरेश पठाडे व आदित्य (उर्फ) गोपाल सुरेश पठाडे व एक अनोळखी व्यक्ती असे आरोपीचे नावे आहेत. शिवाजी रामदास चव्हाण (रा. बोलें) असे मृताचे नाव आहे.
मोबाईलवर इतर व्यक्तीला मोठ्याने शिवीगाळ करीत असल्याबाबत विचारणा केल्याच्या वादातून शिवाजी यांना आरोपींनी गजाने व लाकडी बांबूने मारहाण केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पोलिसांनी सदर प्रकरणी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना ताब्यात घेतले आहे.
अधिक माहिती अशी : शिवाजी चव्हाण हे नातेवाईकांसमवेत बुधवारी सायंकाळी बोलें ते जवळा रोडवरील एका हॉटेलमध्ये गेलेले होते. हॉटेलमध्ये बसून तो कोणाशी तरी फोनवर बोलत मोठ्याने शिवीगाळ करत असताना सुरेश बाबुराव पठाडे याने त्यास या बाबत विचारणा केली होती. यामधून दोघांमध्ये बाचाबाची झाली व या भांडणाचे पर्यावसान जोरदार वादावादीत झाले.
याबाबत माहिती मिळताच, शिवाजी चव्हाण याचे वडील रामदास चव्हाण यांनी आपल्या पत्नीसह तातडीने घटनास्थळी आले होते. त्यावेळी सुरेश पठाडे व आदित्य (उर्फ) गोपाल सुरेश पठाडे व एक अनोळखी व्यक्ती शिवाजीला मारहाण करत असल्याचे त्यांनी पाहिले असे त्यांनी सांगितले.
शिवाजीचे नातेवाईक लक्ष्मण सुखदेव मते (रा. मतेवाडी), नीलेश अभिमान चव्हाण, तसेच मृताचे आई-वडिलांनीही भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. पण आरोपींची काही न ऐकता शिवाजी याना जबर मारहाण केली. या मारहाणीत शिवाजी चव्हाण गंभीर जखमी झाले होते. त्याला तेथेच सोडून आरोपी निघून गेले. यातच शिवाजी याचा मृत्यू झाला.