बळीराजावरील संकटे संपेना… शेतकऱ्यावर ओढवले हे नवे संकट

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2022 :- गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. त्यातच थंडी वाढत असताना दाट धुके पडल्याने शेती पिकांवर रोगराई वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

परिणामी, पिकांवर फवारणीचा अतिरिक्त खर्च वाढणार असून शेतकऱ्यांच्या भांडवली खर्चात वाढ होऊ लागल्याने बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

नुकतेच जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिंगवे परिसरात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे मका, हरबरा, गहू, कांदे या पिकावर मावा, किडरोग, करपा, घाटेअळी यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव या परिसरात वाढत चालला आहे.

एकरी उत्पादन घटते की काय या भितीने शेतकरी महागडे औषधांचा वापर करून औषधांची फवारणी करताना दिसत आहे. एकरी पंधरा ते वीस हजार रुपये खर्च येत असल्यामुळे शेती परवडत नाही.

शेती करावी की नाही असे प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. सध्या अनेक ठिकाणी सकाळी उशिरापर्यंत धुके पडत आहे.

त्यामुळे शेती पिकांवर मोठ्या प्रमाणावर रोगराई येण्याची शक्यता आहे. धुक्यांचा परिणाम पीक वाढीवरही होणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च करावा लागणार आहे.

सध्या शेतात पिकं उभीं असल्याने पिकावर फवारणी करावी लागते म्हणजेच पुढील काळात पिकं दमदार येतील व दोन पैसे जास्त मिळतील या आशेने शेतकरी जगत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe