मुलांकडून होत असलेल्या अन्यायाच्या निषेधार्थ संबंधितांना वेळोवेळी तक्रार करूनही न्याय न मिळाल्याने तालुक्यातील साकुर येथील एका शेतकऱ्याने आज गुरुवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत राजेंद्र गणपत शेंडगे यांनी मुख्यमंत्र्यांना नुकतेच निवेदन पाठवले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, माझ्या मुलांनी संगनमताने मला मारहाण करून घराबाहेर हाकलून दिले असून, २ वर्षांपासून मी घराबाहेर राहत आहे. माझी उपासमार चालु आहे.
इंदिरा आवास योजनेतून मिळालेले घर व माझ्या नावावरील शेतजमीन मुलाने हिसकावली. ते मला घरात व शेतजमिनीत येऊ देत नसल्यामुळे ते मला परत मिळवून द्यावे व त्यांचे पासून मला संरक्षण मिळावे. मुलांनी त्यांच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी राहण्यास जावे.
मला अन्न, वस्त्र, निवारा व औषधोपचार यासाठी निर्वाहखर्च मिळावा. तसेच मुलांकडुन महाराष्ट्र शासनाचे आईवडील, ज्येष्ठ नागरीक यांचे कल्याणासाठी नियम २०१० नुसार संरक्षण मिळावे, अशी मागणी आपण अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी केली आहे.
याबाबत आपणास न्याय मिळाला नाही. त्यामुळे आपण स्वांतत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे सकाळी १० वाजता आत्मदहन करू, असा इशारा शेंडगे यांनी दिला आहे.