Ahmednagar News : रस्त्यांची दुरावस्था, धुळीचे साम्राज्य यामुळे आधीच अर्धी बाजारपेठ उध्वस्त झाली आहे. माञ काहींना शहरात जातीय तेढ निर्माण करत दंगली घडवून आणायच्या आहेत. षडयंत्र रचली जात आहेत.
धार्मिक सण, उत्सवांच्या निमित्ताने जमणाऱ्या हजारोंच्या गर्दीचा गैरफायदा घेत डाव साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र सुज्ञ नगरकरांना कळून चुकलय की गंगाधर हाच शक्तिमान आहे. त्यामुळे दररोज अंधारात एक तर उजेडात दुसरी भूमिका घेणाऱ्यांचे पितळ उघडे पडत असल्याचा घाणाघात शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे.
बाजारपेठ टिकली पाहिजे. मोठ मोठे उद्योग आले पाहीजेत. तरुणाईच्या हातात दगडं, लाठ्या-काठ्या, तलवारी नाही तर रोजी रोटी देणारा रोजगार पाहिजे, ही आपली भुमिका असल्याचे काळे यावेळी म्हणाले. कसब्यातील विजयानंतर शहर काँग्रेस कंबर कसून कामाला लागली आहे.
संघटनात्मक बांधणी, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी काळे म्हणाले की, काही लोक अशांतता निर्माण करण्यासाठी अंधारात खतपाणी घालत आहेत. हेच लोक उजेडात मुंबईत जाऊन शहरात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा कांगावा करत गृहमंत्र्यांकडे पोलिसांच्या तक्रारी करत आहेत.
सुज्ञ नगरकरांना त्यांनी वेडं समजू नये. गृहमंत्र्यांना भेटण्याऐवजी मुख्यमंत्री, उद्योग मंत्र्यांना भेटून शहर विकासाच्या दृष्टीने बाजारपेठ, एमआयडीसीसाठी १० हजार कोटींचे पॅकेज आणण्यासाठी पाठपुरावा करावा, असा खोचक सल्ला यावेळी काळे यांनी बोलताना दिला आहे.
ते पुढे म्हणाले की, अशांतता निर्माण करत बाजारपेठेला टार्गेट केले जात आहे. खड्डे, खडीचे रस्ते, धूळ यामुळे व्यापारी, हातावर पोट भरणारे कामगार, फेरीवाले यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सर्व सत्ता केंद्र पूर्णपणे हातात असून देखील फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी जाणीवपूर्वक केली जात नसून या माध्यमातून घाणेरडे राजकारण करत दुटप्पी भूमिका घेत व्यापारी, फेरीवाले यांना वेठीस धरत वातावरण चिघळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाजारपेठेतील धंदा निम्म्याहून कमी झाला आहे.
त्यातच मध्यवर्ती बाजारपेठेत दंगल झाली तर व्यापाऱ्यांची दुकानं, हातगाड्या फुटतील. किंबहुना ती फोडली जातील. रक्तपात घडवला जाईल. कर्फ्यू लागेल. आठ – पंधरा दिवस बाजारपेठ, जनजीवन ठप्प होईल,
अशी चिंता काळे यांनी व्यक्त केली आहे. काळे पुढे म्हणाले की, अशांतता, अस्थिर वातावरणामुळे ग्राहक बाजारपेठेकडे कायमची पाठ फिरवतील. चार – सहा महिने वातावरण सुरळीत होणार नाही. एकदा का ग्राहकांचा पाय अन्यत्र वळला तर मात्र बाजारपेठ पुन्हा कधीही रुळावर येणार नाही.
राजकारणी मंडळी राजकीय पोळ्या भाजण्यासाठी नौटंकी करतील. यात मात्र व्यावसायिक कायमचे उध्वस्त होतील. दंगलींमध्ये दोन्ही बाजूने गंभीर गुन्हे दाखल होतात. तरुणांची आयुष्य कायमची उध्वस्त होतात.
राजकारणी माञ आपल्या पोळ्या भाजून घेतात. ज्यांच्यासाठी सर्वधर्मीय कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं आज त्यांच्याच जीवावर काही मंडळी उठली आहेत. जे स्वतःच्या कार्यकर्त्यांचे नाही झाले ते नगरकरांचे काय होणार ? असा सवाल यावेळी काळे यांनी कुणाचेही नाव न घेता उपस्थित केला.
यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी मनपा विरोधी पक्षनेता दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषाताई भगत, युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते आदींसह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.