Onion News : कांदा निर्यातीची बंदी उठवण्याची मागणी सत्ताधारी त्याचबरोबर विरोधकांकडून जोरदाररीत्या झाल्याने केंद्र सरकारने २० फेब्रुवारी रोजी महत्त्वाची घोषणा केली.
बांगलादेश, मॉरिशस, बहरिन व भूतान या चार देशांना ३१ मार्चपर्यंत ५४ हजार ७६० मेट्रीक टन कांदा व्यापाऱ्यांमार्फत निर्यात करण्याचा निर्णय झाल्याने शेतकरी वर्गाला तूर्त दिलासा मिळाला आहे.
याच अनुषंगाने नगरच्या कृषी उत्पन्न मार्केट कमिटीने कांदा निर्यातीबाबत जय्यत तयारी केली असून, लवकरच नगरचा कांदा परदेशात पोहोचणार आहे. नगरच्या मार्केट कमिटीने कांदा आवकबाबत सुप्रसिद्ध असलेल्या सोलापूर, लासलगावला मागे टाकून राज्यात अव्वल क्रमांक प्राप्त केला आहे, असा दावा केला जात आहे.
नगरच्या मार्केट कमिटीत आठवड्यातून सोमवार, गुरुवार व शनिवार हे तीन दिवस कांद्याचा लिलाव केला जातो. दररोज मार्केट कमिटीत ४०० ते ५०० मालट्रक कांद्याची आवक होते.
एका मालट्रकमध्ये साधारण ३० टन इतका कांदा असतो. नगरसह छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, बीड, येवला (नाशिक) आदी जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर लाल कांद्याची आवक नगरला होते.
नगरला महिन्याकाठी ६ लाख क्विंटल कांद्याची आवक होते. त्या अनुषंगाने कोट्यवधींची उलाढाल होत आहे. स्थानिक त्याचबरोबर आंध्र प्रदेश,
केरळ, कर्नाटक आदी राज्यांतील व्यापारी नगरच्या मार्केट कमिटीतून कांदा खरेदी करतात. त्यांनी खरेदी केलेला कांदा देश तसेच परदेशात पाठवला जातो.
सध्या १२०० ते १८०० प्रति क्विंटल, असा कांद्याला भाव आहे. लासलगावला सुट्या (मोकळ्या) कांद्याची आवक होते. याउलट नगरला पॅकिंग करून कांद्याची आवक येते.
पॅकिंगमुळे शेतकऱ्यांच्या कांद्याला इतर मार्केटच्या तुलनेने दोन पैसे जास्त भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल नगर मार्केट कमिटीकडे वाढू लागला आहे.
नगरच्या मार्केट कमिटीतून थेट श्रीलंका, दुबई, भूतान, नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानसह अन्य देशांत मोठ्या प्रमाणावर कांदा निर्यात केला जातो.
नगरचा कांदा होतो ७ देशांत निर्यात
लाल कांदा आवकबाबत नगरची मार्केट कमिटी काही महिन्यांपासून राज्यात अव्वल आली आहे. २०२२-२३ च्या वर्षाकाठी ५७ लाख क्विंटल कांद्याची आवक झाली होती.
त्याचबरोबर १ एप्रिल २०२३ ते २२ फेब्रुवारी २०२४ पर्यंत ५२ लाख ९४ हजार ३१३ क्विंटलची आवक झाली आहे. ही आवक सोलापूर, लासलगावच्या तुलनेने अधिक आहे.
मार्केट कमिटीचा कांदा किमान ७ ते ८ देशांत निर्यात केला जातो. सध्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार बांगलादेश, मॉरिशस, बहरिन व भूतान या देशांत व्यापाऱ्यांमार्फत कांदा निर्यातीचे उत्तम नियोजन करण्यात आले असून, लवकरच नगरचा कांदा परदेशात दाखल होईल.
या निर्णयामुळे कांद्याच्या भावात चांगली वाढ होईल अन् शेतकऱ्यांच्या पदरी दोन पैसे पडतील, असा दावा मार्केट कमिटीचे चेअरमन भाऊसाहेब बोटे व सचिव अभिषेक भिसे यांनी केला आहे.