Ahmednagar News : गतिमान आणि कार्यक्षम म्हणणाऱ्या सरकारने तात्काळ श्रीरामपूर जिल्हा घोषित करावा. यासाठी त्यांना प्रभु श्रीरामानीच सद्बुद्धी द्यावी आणि रामायणकालीन अहिल्या शिळा ज्याप्रमाणे शाप मुक्त झाली, त्याप्रमाणे श्रीरामपूर शहर एकदाचे शाप मुक्त व्हावे, यासाठी येथील संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष राजेंद्र लांडगे यांनी प्रभू श्रीरामाला साकडे घातले.
यावेळी उपाध्यक्ष अॅड. सुभाष जंगले, अशोक बागुल, कार्याध्यक्ष भागचंद औताडे, लकी सेठी, विजय नगरकर, राजेंद्र गोरे, अभिषेक बोर्डे, अॅड. बाबा शेख, माणिकराव जाधव, शिवाजी सिनारे, संदिप गायधने, प्रा. अशोक राहाणे, बाबासाहेब पवार, अशोक शिरसाठ, भाऊसाहेब काळे, शुभम पाटणी आदी उपस्थित होते
यावेळी राजेंद्र लांडगे म्हणाले, आजची श्रीरामपूरची झालेली वाताहत भविष्यात कोणालाही परवडणारी नसेल. यावर गांभीर्याने आत्मचितन व्हावे. गतिमान आणि कार्यक्षम म्हणणारे सरकारकडे एकीकडे निधी नसल्याचे सांगते आणि दुसरीकडे सातत्याने श्रीरामपूरवर अन्याय करत शिर्डीवर एकप्रकारे उधळमाथ्याने उधळपट्टी करत आहे.
हे दुर्दैवी बाब म्हणण्याची वेळ आली आहे. एकाच दिवशी श्रीरामपूर, बारामती, औरंगाबाद औद्योगिक वसाहतीची उद्घाटन झाले. आज श्रीरामपूर औद्योगिक वसाहत दुरावस्थेला जबाबदार कोण? या मुद्यावर देखील आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
श्रीरामपूर जिल्हा हा प्रतिष्ठा आणि भावनिक होत चालला आहे. साठ हजार वर्ष अहिल्या शिळा होऊन पडली होती. प्रभू श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहिल्या शिळा शाप मुक्त झाली.
तसे प्रभू श्रीरामाचे नावाने पावन झालेले श्रीरामपूर एकमेव शहर आहे. या निमित्ताने श्रीरामपूर शहर शाप मुक्त व्हावे म्हणून श्रीरामालाच साकडे घालण्याची वेळ आली. सर्व जनतेला खात्री आहे कि श्रीरामपूर जिल्हा होण्याची शक्ती प्रभू श्रीरामात आहे.”
आम्ही वाजत गाजत अयोध्या नगरीत जाऊन आनंदोत्सव साजरा करू. म्हणून संघर्ष समितीने दसरा सणाचे औचित्य साधत श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी प्रभू श्रीरामालाच साकडे घालण्याचा निर्णय घेतला.
निकषाचे आधारे बहुतांशी कार्यालये श्रीरामपूरात चालू आहे. श्रीरामपूर जिल्हा होण्यासाठी अनेकदा जनआंदोलने झाली. पूर्वीचे वैभव पुन्हा प्राप्त होण्यासाठी लवकरच आक्रमक लढा उभारू असेही राजेंद्र लांडगे म्हटले आहे.