जिवंत सातबारा मोहीम आणि अहिल्यानगरच कनेक्शन ! शेवगावचा सुपुत्र, राज्यात हिरो

Published on -

शेवगाव: शेवगाव तालुक्यातील मूळ रहिवासी आणि सध्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले संतोष काकडे यांनी आपल्या कार्यक्षेत्रात सुरू केलेली ‘जिवंत सातबारा’ मोहीम आता राज्यभर राबवली जाणार आहे.

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार महसूल विभागाला यासंबंधी शासकीय आदेश प्राप्त झाले आहेत. या मोहिमेमुळे शेतकऱ्यांच्या वारसांना होणारी ससेहोलपट संपुष्टात येण्यास मदत होणार असून, राज्यातील शेतीच्या मालकी हक्कांशी संबंधित अडचणी दूर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांमध्ये अनेकदा वाद निर्माण होतात, ज्यामुळे वारस नोंदी लांबणीवर पडतात. काही वेळा वारसांच्या माहितीच्या अभावामुळे किंवा प्रक्रियेच्या जटिलतेमुळेही ही नोंदणी रखडते.

परिणामी, राज्यातील हजारो एकर शेती मयत शेतकऱ्यांच्या नावावरच राहते. यामुळे वारसांना शेतीशी संबंधित सरकारी योजना, अनुदान किंवा कर्ज सुविधांचा लाभ घेता येत नाही. ही अडचण लक्षात घेऊन संतोष काकडे यांनी चिखली तालुक्यात एक कृती कार्यक्रम आखला.

त्यांनी १४८७ प्रलंबित प्रकरणांपैकी ५०२ वारस नोंदी एका महिन्यात पूर्ण करून वारसांना फेरफार वाटप केले. या यशस्वी उपक्रमाची दखल घेत बुलढाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी ही मोहीम जिल्ह्याच्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमात समाविष्ट केली.

त्यानंतर महसूल विभागाने हा उपक्रम राज्यभर राबवण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी कालबद्ध कार्यक्रमही जाहीर केला. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांना ठरलेल्या कालावधीत वारस नोंदींची कामे पूर्ण करावी लागणार आहेत.

‘जिवंत सातबारा’ मोहिमेचा उद्देश सातबारा उताऱ्यावर मयत खातेदारांची नावे काढून त्याऐवजी वारसांची नावे नोंदवणे हा आहे. यामुळे जमीन व्यवहारात पारदर्शकता येण्यासोबतच शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांचे हक्क मिळण्यात सुलभता येईल.

संतोष काकडे यांच्या या अभिनव उपक्रमाने शेवगावच्या मातीतील प्रशासकीय कौशल्याची झलक पुन्हा एकदा राज्यभर पोहोचली आहे. शेवगाव हे तालुका केवळ शेतीसाठीच नव्हे, तर प्रशासकीय क्षेत्रातही आपली ओळख निर्माण करत आहे.

संतोष काकडे यांच्यापूर्वी डॉ. पुरुषोत्तम भापकर (IAS), तेजस्वी सातपुते (IPS), मृदुला भारदे (अपर सचिव), डॉ. आदिनाथ काटे (कृषी संशोधक), दिवंगत उत्तमराव करपे (जि. प. सीईओ) आणि रवींद्र भारदे यांसारख्या सनदी अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी करून शेवगावचे नाव उंचावले आहे.

या सर्वांनी सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून केलेले कार्य राज्यभर कौतुकाचा विषय ठरले आहे. संतोष काकडे यांचा ‘जिवंत सातबारा’ हा उपक्रमही या परंपरेचा एक भाग बनला असून, शेवगावच्या मातीतील नेतृत्वगुणांचा हा आणखी एक दाखला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe