Ahmednagar News : पारनेर तालुक्यात सुरु असणाऱ्या विविध घडामोडी थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. आता पारनेरमधील पळशीतील अपघाताने आता एक वेगळे वळण घेतले आहे. या अपघातामध्ये २१ वर्षीय तरुण अजिंक्य अरुण डहाळे हा जखमी झाला होता व त्याचा उपचारादरम्यान शनिवारी (दि.२२) रात्री मृत्यू झाला. परंतु आता हा अपघात नसून घातपात आहे असे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे.
त्यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे धाव घेत आरोपीना अटक करण्याची मागणी केलीये. अधिक माहिती अशी : अजिंक्य अरुण डहाळे याची दुचाकी व पिकअपचा वडगाव सावताळ येथे मंगळवारी (दि.११ जून) अपघात झाला होता. त्याच्यावर उपचार सुरु असताना शनिवारी (दि.२२) रात्री मृत्यू झाला.

आता याप्रकरणी पळशी येथील संदीप सुखदेव मोढवे व सुखदेव मोढवे या दोघांवर खुनाचा गुन्हा दाखल करून तातडीने अटक करावी, अशी मागणी या तरुणाच्या आईसह नातेवाइकांनी केली आहे. आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक न केल्यास मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे या तरुणाचे वडील अरुण डहाळे, मामा धनंजय उदावंत, आजोबा दिलीप उदावंत यांनी विखे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
नगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करू नये. मृतदेहाची उत्तरीय तपासणी छत्रपती संभाजीनगरच्या घाटी शासकीय रुग्णालयात करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. त्यामुळे पळशी गावात काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अपघाताच्या घटनेत तरुणाच्या पायाला, हाताला, डोक्याला मार लागला होता.
त्यामुळे नगरच्या खासगी रुग्णालयात डोक्याला शस्त्रक्रिया करून उपचार चालू होते; परंतु या जखमी तरुणाच्या कुटुंबीयांनी हा अपघात नव्हे, तर हा पूर्व नियोजित कट व हल्ला केल्याचा आरोप केला आहे. याबाबत नूतन अरुण डहाळे यांनी रीतसर फिर्याद दिली आहे. याप्रकरणी संदीप सुखदेव मोढवे, त्याचे वडील सुखदेव मोढवे (दोघे, रा. पळशी, ता. पारनेर) यांच्यावर ३०७ कलमांन्वये पारनेर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.
संशयित स्वतःहून पोलिसात हजर
दरम्यान या घटनेबाबत फिर्याद आल्याने पोलिसांनी पुढील तपासासाठी पिकअप ताब्यात घेतली. संशयित व्यक्तींना पारनेर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, तसेच दोन्ही संशयित मारहाणीच्या भीतीने शनिवारी रात्री स्वतःहून पोलिसात हजर झाले होते.