सोसायटीच्या निवडणूकीतील पराभव जिव्हारी लागला; विजयी उमेदवाराच्या मुलावर केला जीवघेणा हल्ला

Published on -

अहिल्यानगर : सोसायटीच्या निवडणुकीत फॉर्म काढुन घेतला नाही, या कारणावरून चार जणांनी विजयी उमेदवाराच्या मुलावर हल्ला केला. या मारहाणीत मुलगा गंभीर जखमी झाला असून, याप्रकरणी सोपान गोरख जाधव, अशोक नवनाथ जाधव, बापुराव बाबासाहेब जाधव व विनोद दिलीप बहीर (सर्व रा.नाहुली ता.जामखेड जि.अहिल्यानगर) यांच्यावर खर्डा पोलीस स्टेशनला मारहाण व ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी, जामखेड तालुक्यातील नाहुली सेवा संस्थेच्या निवडणुकीत विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संचालक सचिन घुमरे व काकासाहेब गर्जे यांच्या नेतृत्वाखाली सुरूवातीला नऊ जागा बिनविरोध झाल्या होत्या. तसेच विरोधकांच्या एका उमेदवाराने माघार घेतल्याने दहावी जागाही बिनविरोध आली. यानंतर राहिलेल्या तीन जागांसाठी निवडणुक झाली. या निवडणुकीत घुमरे व गर्जे यांच्या गटाचे तीनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. यामुळे एकुण तेराच्या तेरा जागांवर विजय मिळवला. मात्र हा विजय विरोधकांच्या चांगलाच जिव्हारी लागला.

दि.१५ मार्च रोजी बाळु खवळे हे त्यांच्या वस्तीवरील वेल्डिंगच्या दुकानासमोर उभे होते. यावेळी गावातील सोपान गोरख जाधव, अशोक नवनाथ जाधव, बापुराव बाबासाहेब जाधव व विनोद दिलीप बहीर हे चारजण त्या ठिकाणी आले. हे सर्वजण व गावातील काही ग्रामस्थ सोसायटीच्या मतदानाबाबत चर्चा करत होते. तेव्हा ते खवळे यास म्हणाले की तु तुझ्या वडीलांचा सोसायटीचा भरलेला अर्ज का काढुन घेतला नाही असे म्हणुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने व दगडाने मारहाण केली. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe