अण्णांची मनधरणी करण्यासाठी पोलिस उपमहानिरीक्षक पोहचले थेट राळेगणला

अहमदनगर Live24 टीम,  12 फेब्रुवारी 2022 :-  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सोमवारपासून ( ता. 14 ) उपोषण करणार असल्याचे जाहीर केले आहे. राज्य सरकारने सुपर मार्केट व किराणा दुकानांत वाईन विक्रीला परवानगी दिली आहे.

या विरोधात त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मात्र अण्णांनी उपोषण करू नये म्हणून त्यांची मनधरणी करण्यासाठी आता प्रशासकीय अधिकारी राळेगणसिद्धीत येऊ लागले आहे.

नाशिक विभागाचे पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी देखील अण्णांची भेट घेतली आहे. मात्र अण्णा हजारे अजूनही उपोषणावर ठाम आहेत.

दरम्यान पोलिस उपमहानिरीक्षक बी. जी. शेखर पाटील यांनी हजारे यांची आज भेट घेऊन उपोषण करू नये अशी विनंती केली. तसेच वाढत्या आपल्या वयाचा विचार करता उपोषण आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक आहे.

त्यामुळे हा प्रश्न चर्चा करून सोडवावा अशी विनंती केली. मात्र चर्चेनंतर हजारे यांनी मी माझ्या मागणीवर ठाम आहे. राज्य सरकारने वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे.

त्यांनी तो मागे घ्यावा. मी माझ्या मागणीवर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे हजारे यांचे उपोषण जवळजवळ निश्चितच झाल्याचे दिसून येत आहे.