कोरोना लसीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी केला हा दावा

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2021 :-आरोग्य यंत्रणेतील कोरोना योद्धयांना को-व्हॅक्सीनचे अर्थात लसीकरणाचे काम दि. १६ जानेवारीपासून जिल्हयातील १२ केंद्रावर सुरू झाले आहे.

पहिल्याच दिवशी ८७१ जणांचे लसीकरण करण्यात आले. दरम्यान, लसीमुळे त्रास होत असल्याच्या बातम्या निराधार असून लसीबाबत संभ्रम नकोच.

लाभार्थ्यांनी भिती बाळगण्याचे कारण नाही, असा स्पष्ट निर्वाळा जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिला आहे. कोरोनाविरुध्दच्या एक वर्षाच्या संघर्षानंतर अखेर स्वदेशी को – व्हॅक्सीनच्या निर्मीतीस यश आले.

या लसीचे पहिल्या टप्प्यातील डोस मागील आठवड्यात प्राप्त झाले. दि. १६ जानेवारीपासून लसीकरणास देशभर सुरूवात झाली. या संदर्भातील माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, नगर जिल्ह्यास ३२ हजार ९०० डोस प्राप्त झाले आहेत.

मनपा क्षेत्रासाठी ३ हजार ५००, एमआयआरसीकरीता ३१० आणि उर्वरीत ग्रामीण क्षेत्रासाठी २५ हजार ४०० डोस लसीकरणासाठी वापरले जाणार आहेत.

लसीकरणासाठी मनपा हद्दीत चार आणि उर्वरीत जिल्ह्यात आठ अशी १२ केंद्र आहेत. पहिल्या दिवशी बाराशे उद्दीष्टाच्या तुलनेत ८७१ अर्थात ७१ टक्के लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले.

यापैकी फक्त चार जणांना किरकोळ स्वरूपाची प्राथमिक लक्षणे जाणवली. मात्र, त्यामुळे लसीबाबत संभ्रम बाळगण्याचे कारण नाही. लसीचे गंभीर दुष्परिणाम होत नाहीत.