अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :-कोरोना पाठोपाठ राज्यात बर्ड फ्लूनंही शिरकाव केला आहे. रविवारी परभणीच्या मुरुंबा गावातील 800 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूनेच झाला असल्याचं स्पष्ट झालं होतं. अशातच नगर जिल्ह्यात देखील अफवांचा बाजर उठला आहे.
दरम्यान याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे. जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्ल्यूची नोंद झाली नसली तरी राज्यात इतर जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूच्या घ़टना आढळून आल्याने जिल्हा प्रशासन आणि पशुसंवर्धन विभागाने प्रतिसाद आणि प्रतिबंधासाठी पुढाकार घेतला आहे.
त्यासाठी ७८ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. नागरिकांनीही कोणत्याही अफवांवर अथवा चुकीच्या माहितीवर विश्वास न ठेवता पोल्ट्री व्यवसाय अडचणीत येणार नाही, याची काळजी घ्यावी तसेच पोल्ट्री चालकांनीही पोल्ट्री फार्मसमघील एखादा पक्षी मृत्यूमुखी पडला तर तात्काळ त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाच्या पथकाला द्यावी,
असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे. राज्यातील काही जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या काही घटना निदर्शनास आल्यावर जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी यासंदर्भात आज पशुसंवर्धन विभाग आणि आरोग्य विभागाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जिल्ह्यातील एकूण पशुधन,
कुकुटपक्ष्यांची संख्या, जिल्ह्यातील पोल्ट्री फार्मसची संख्या आदींबाबत आढावा घेतला. सध्या जिल्हयात ३ हजार ३४१ पोल्ट्री फार्मस असून त्यात १ कोटी १४ लाख पक्षी आहेत. पाथर्डी तालुक्यात एका पोल्ट्री फार्ममधील ५० कुक्कुट पक्ष्यांचा मृत्यू झाला असला तरी, त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
अद्याप या पक्ष्यांचा मृत्यू कशामुळे झाला, याचा अहवाल आलेला नाही. मात्र, पोल्ट्रीचालकांनीही काळजी घेणे आवश्यक आहे. एखाद्या पक्ष्याचा मृत्यू झाला तर तात्काळ पशुसंवर्धन विभागाला माहिती द्यावी.
तपासणी झाल्यानंतर पक्ष्यांची योग्य ती विल्हेवाट लावणे महत्वाचे आहे. संबधित पोल्ट्रीफार्मसची स्वच्छता खूप महत्वाची आहे. मृत्यू झालेले पक्षी खोल खड्डा घेऊन त्यात पुरणे आवश्यक आहे. जेणेकरुन पक्ष्यांचा अहवाल बर्ड फ्ल्यूचा आला तर त्याचा प्रसार रोखला जाईल, असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.
- अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, all rights reserved