अहमदनगः बनावट कागदपत्रांच्या आधारे साडेआठ कोटींचे कर्ज प्रकरण मंजूर करणाऱ्या डॉक्टरांचा जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी (दि. 20) फेटाळून लावला. डॉ. राकेश कांतिलाल गांधी (रा. पाईपलाइन रस्ता, सावेडी) आणि डॉ. आशिष अजित भंडारी (रा. सारसनगर) ही जामीन फेटाळलेल्यांची नावे आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एस. लोणे यांच्यासमोर ही सुनावणी झाली.
रेंज फौंडेशनच्या स्थापनेपासून डॉ. राकेश गांधी हा अध्यक्ष आहे. बाबाजी हरी कर्पे पाटील प्रतिष्ठानमार्फत साई एंजल स्कूल, तवलेनगर, सावेडी हे चालविले जाते. त्यामध्ये अमित रसिकलाल कोठारी, डॉ. राकेश गांधी, डॉ. आशिष भंडारी हे विश्वस्त आहेत.
साई एंजल स्कूलच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामासाठी डॉ. राकेश गांधी व डॉ. आशिष भंडारी यांनी दि. ९ फेब्रुवारी २०२३ ते दि. १३ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत बनावट कागदपत्रांच्या आधारे साडेआठ कोटींचे कर्ज प्रकरण बँकेत सादर केले. या कर्ज प्रकरणासाठी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे बनावट ठरावही सादर केले होते.
अमित रसिकलाल कोठारी (रा. माणिकनगर, अहमदनगर) यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात २ मे रोजी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी डॉ. राकेश गांधी व डॉ. आशिष भंडारी या दोघांविरूद्ध बनावट कागदपत्रे तयार करणे, फसवणूक करणे, विश्वासघात करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. गांधी आणि डॉ. भंडारी यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर केले होते. अतिरिक्त सरकारी वकील यू. जे. थोरात यांनी केलेला युक्तीवाद न्यायालयाने ग्राहय धरून दोघांचे ही जामीन अर्ज फेटाळले आहेत.