श्वानाने अवघ्या काही वेळातच आरोपी दिला पकडून; आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 28 ऑक्टोबर 2021 :-  आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस श्वान पथकाचा वापर करतात. अशाच प्रकारे श्रीगोंदा तालुक्यातील एका घटनेत पोलिसांच्या श्वानाने काही वेळातच आरोपी पकडून दिला.

दरम्यान खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीला जन्मठेप ठोठावण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीगोंदा तालुक्यातील कौठा या गावात ४ एप्रिल २०१७ रोजी डॉ. विपुल डे यांचा खून झाला होता. यामध्ये न्यायालयाने आरोपी संभाजी महादेव थोरात (वय ५२, रा. कौठा) याला जन्मठेपेची शिक्षा दिली आहे.

याप्रकरणी आरोपी पकडून देण्याची पोलिसांच्या श्वानाची कामगिरीही महत्त्वाची ठरली आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण… डॉ. विपुल डे कौठा येथे राहत होते. वैद्यकीय व्यावसायासोबत ते पशुपालनही करीत होते. त्यासाठी त्यांनी कंत्राटी पद्धतीने शेत घेऊन तेथे जनावरांच्या चाऱ्याचे पीक घेतले होते. त्यांची ही शेती आरोपी थोरात याच्या शेताशेजारी आहे.

घटनेच्या दिवशी थोरात शेतात गेला होता. रात्रीचे नऊ वाजले तरी ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोधशोध केली. दुसऱ्या दिवशी सकाळी डे यांचा मृतदेह थोरात याच्या शेताजवळ आढळून आला. याची माहिती समजताच पोलिसांनी श्वान पथकालाही पाचरण केले.

श्वानाने घटनास्थळावरून माग काढत थेट थोरात याचे घर गाठले आणि थोरात हा आरोपी असल्याकडे पोलिसांचे लक्ष वेधले. थोरातने पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिली. खूनाच्यावेळी घातलेले आणि घरातच लपवून ठेवलेले कपडेही आरोपीने काढून दिले. डॉ. डे यांचे पत्नीशी संबंध असल्याच्या संशयावरून खून केल्याची कबुलीही आरोपीने पोलिसांकडे दिली.

यावर डॉ. डे यांच्या पत्नी सुप्रिया डे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe