Ahmednagar News : लग्नातील मेहंदीच्या कार्यक्रमासाठी घराला कुलूप लावून गेल्याने पाळत ठेऊन बंद घराचा दरवाजा कटरने तोडून घरातील ६ लाख ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी शिवारात घडली.
या बाबत श्रीगोंदा पोलिस ठाण्यात मारुती बाबुराव लाड यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी हे काष्टी येथून जवळच असलेल्या रेल्वे स्टेशन रस्त्यावर शेतात राहतात. फिर्यादी यांचे काष्टी येथील लहान भाऊ डॉ.नवनाथ लाड यांच्या मुलाचे २२ जानेवारी लग्न असल्याने लग्नाच्या तयारीसाठी तसेच लग्नानिमित्त आयोजित मेहंदी कार्यक्रमासाठी फिर्यादी व त्यांचे कुटुंबीय शनिवारी रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून कार्यक्रमासाठी काष्टी गावातील लहान भावाच्या घरी गेले होते.
मेहंदी कार्यक्रम उरकल्यानंतर फिर्यादी आणि त्यांचे कुटुंबीय घरी परत आले असता घराच्या दरवाजाचा कडीचा कोयंडा अज्ञात चोरट्याने कटरच्या साहाय्याने कट केलेला दिसून आला. दरवाजा उघडून घरात जाऊन पाहिले असता घरातील कपाटाचे लॉक खोलून उचका पाचक झाल्याचे दिसून आले.
अधिक पाहिले असता कपाटाच्या लटकवलेल्या पिशवीतील दोन लाख रुपये रोख रक्कम तसेच सुटकेसमध्ये ठेवलेले एक लाख रुपये आणि पेटीत ठेवलेले १८ हजार रुपये असे एकूण ३ लाख १८ हजार रुपये चोरुन नेल्याचे दिसून आले.
याच बरोबर कपाटातील ३ लाख ६४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा एकूण ६ लाख ८२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी घरावर पाळत ठेऊन चोरुन नेला. घटनेची माहिती श्रीगोंदा पोलिस ठाण्यात कळविली असता उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे,
पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत पोलिस उपनरीक्षक समीर अभंग यांना तपासासाठी सूचना करत घटनस्थळी श्वानपथकासह ठसेतज्ज्ञ अधिकारी बोलावत तपास सुरू केला.