आधीच कोसळलेल्या भावाने पिचलेल्या शेतकऱ्यावर अवकाळीने डोळे वटारले ! शेतकऱ्यांची अवस्था इकडे आड अन तिकडे विहीर

अहिल्यानगर तालुक्यात अचानक हवामान बदलामुळे शेतकऱ्यांची धांदल उडाली आहे. अवकाळी पावसाच्या अंदाजामुळे कांदा, गहू, आंबा व चाऱ्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. आधीच भाव पडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे मोठे संकट निर्माण झाले आहे.

Updated on -

Ahilyanagar News : हवामानात झालेल्या बदलामुळे शेतकऱ्यांची मोठी धांदल उडाली आहे. जिल्ह्यातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने अगोदरच कांद्याचे दर कोसळलेल्या शेतकऱ्यांवर अवकाळीचे संकट उभे ठाकले आहे.

गहू, कांदा उत्पादक शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली असून शेतकऱ्यांमधील चिंता वाढली आहे. तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे आंबा फळबागाला मोठा फटका बसला आहे. काल व परवा झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे.

शेतकऱ्यांची धाकधूक वाढली

तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांशी भागात गावरान कांदा काढणीला आलेला आहे. तर उशिरा पेरण्या झालेल्या गहू देखील सोंगण्याचे काम सुरू आहे. अशातच गेल्या तीन-चार दिवसांपासून वातावरणात झालेल्या अचानक बदलामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.

बाजारात कांद्याचे भाव गडाडल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त करण्यात येत होती. त्यातच अवकाळीचे संकट समोर ठाकले असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक नियोजन अवलंबून असलेल्या कांदा पिकावर अवकाळीचे संकट दिसून येत असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अवकाळीचे संकट ओढवण्याची शक्यता

रब्बी हंगामातील सुमारे वीस हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड करण्यात आलेली होती. त्यामधील बहुतांशी कांदा हा काढणीला आलेला आहे तर काही भागात कांदा काढून शेतातच पडलेला आहे. उशिरा पेरण्या झालेल्या गव्हाच्या सोंगणीचे काम सुरू असून अवकाळी पाऊस आल्यास कांद्याबरोबरच गव्हाचे देखील मोठे नुकसान होणार आहे.

चारा पिकांचे देखील नुकसान होणार आहे. कडबा भिजल्यास खराब होत असतो. लसुन व इतर चारा पिकांवर देखील अवकाळीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झालेला आहे.

लाल कांद्यास पाच ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे शेतकऱ्यांना भाव मिळाला होता. त्यामुळे तालुक्यात गावरान कांद्याची लागवड देखील मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे सर्वत्र कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येते.

चालू वर्षी पाण्याअभावी गावरान कांद्याचे क्षेत्र घटल्याचे दिसून येते. कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांनी विक्रमी कांद्याचे उत्पादन झाल्याने गावरान कांद्याचे दर कोसळले असून दीड हजार रुपये प्रति क्विंटल असा सरासरी भाव मिळत आहे.

अहिल्यानगर तालुका कांद्याचे पठार म्हणून ओळख निर्माण करत आहे. लाल, रांगडा, गावरान कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येत असते. तालुक्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित हे कांद्याच्या उत्पादनावरच ठरलेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News