परराज्यातील चौघांनी नगरच्या व्यापाऱ्याला दीड कोटींना गंडवले

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2021 :- परराज्यातील चौघांनी नगर येथील कांदा व्यापार्‍याची दीड कोटी रूपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. व्यापारी गणेश मुरलीधर तवले यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रसाद के., स्टीफन प्रवीणकुमार, सुजय बेलूर, मांतेश पाटील (चौघे रा. बंगळुरू, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, व्यापारी तवले शेतकर्‍यांकडून कांदा खरेदीकरून परराज्यातील व्यापार्‍यांना पाठवितात. तवले यांची कर्नाटकच्या तस्करबेरी अ‍ॅग्री व्हेंचर या कंपनीच्या चार जणांशी ओळख झाली.

त्यातील दोघे तवले यांना त्यांच्या कार्यालयात भेटले. त्यांनी तवले यांना कर्नाटकमध्ये बोलावले. तेथे त्यांच्यात व्यवसायाची बोलणी झाली.

त्यानंतर फेब्रुवारी 2021 ते ऑगस्ट 2021 या कालावधीमध्ये नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा सात कोटी सात लाख 29 हजार 686 रूपयांचा माल त्यांनी ठरल्याप्रमाणे त्या कंपनीला वेळोवेळी पाठविला.

कंपनीकडून पाच कोटी 53 लाख 83 हजार 551 रूपये हे तवले यांना त्यांच्या गणेश ट्रेडिंग फर्मच्या खात्यावर पाठविले गेले. उर्वरित एक कोटी 50 लाख 46 हजार 135 रूपये मिळावी, याकरिता त्यांनी त्यांच्याशी सातत्याने संपर्क केला.

मात्र राहिलेले पैसे मिळत नसल्याने अखेर शेवटी व्यापारी तवले यांनी तोफखान्यात फिर्याद दिली. त्यानुसार तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe