Ahmednagar Breaking : चौघे स्टेट बँकेचे एटीएम फोडत होते, थेट मुंबईत सिग्नल गेला, त्यानंतर…

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : एटीएम फोडण्याच्या, चोरण्याच्या अनेक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडत आहेत. आता आणखी एक प्रकार समोर आला आहे. पारनेर तालुक्यातील सुपा येथील पारनेर रस्त्यालगत असणारे स्टेट बँकेचे एटीएम फोडताना चौघा आरोपींना सुपा पोलिसांनी जेरबंद केले. येथील एटीएम फोडतानाचा सिग्नल थेट मुंबईत गेल्याने चोरटे रंगेहात पकडले गेले.

सुपा-पारनेर रस्त्यावर शहाजापूर चौकातील मळगंगा इमारतीत भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशिन आहे. रविवारी (ता.७) पहाटे १ वाजून ३० मिनिटांनी अंधाराचा फायदा घेत आरोपी दत्तात्रय विठ्ठल विरकर, अनंतकुमार नवनाथ गाडे (रा.लोणी काळभोर,जि.पुणे), आरोपी इसाक मचकुरी व चौथ्या आरोपीचे नाव समजू शकले नाही हे एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत होते.

यावेळी एसबीआय बँकेच्या मुंबईतील एटीएम कंट्रोलला सिग्नल गेला. तेथील अधिकाऱ्यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ सुपा पोलिसांना फोन करून चोरी होत असल्याची माहिती दिली.

सुपा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.त्यांना वरील चार आरोपी चोरी करण्याच्या उद्देशाने एटीएम मशिन फोडत असल्याचे निदर्शनास आले.सुपा पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींकडून पक्कड, कटावनी, गॅस कटर, छोटा गॅस सिलेंडर, एक मोटारसायकल, तसेच चोरी करण्याची सामग्री ताब्यात घेतली. आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

दरम्यान पोलीसांची चाहूल लागताच यातील इसाक मचकुरी व इतर एक आरोपी लाल रंगाच्या स्विप्ट कारमधून पळून जाण्यात यशस्वी झाले. सदर आरोपींचा शोध पथकाद्वारे घेण्यात येत आहे. वरील कारवाई स.फौ.रमेश शिंदे, पो.ना. भरत इंगळे, पो.ना. राहूल हिंगसे आदींच्या पथकाने केली. पुढील तपास सुपा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली आरएस पटेल हे करत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe