नियमांचा फज्जा ! बंदीनंतरही प्लास्टिकचा खुलेआम सुळसुळाट

अहमदनगर Live24 टीम, 25 डिसेंबर 2020 :- पर्यावरणाचा र्‍हास करणार्‍या प्लास्टिकला हद्दपार करण्यासाठी राज्य सरकारने राज्यात प्लास्टिक बंदी लागू केल्यानंतर मनपा व पालिकांनी प्लास्टिकचा वापर करणार्‍यांवर कारवाई सुरू केली होती.

यामुळे प्लास्टिकचा वापर करण्याचे प्रमाण कमी झाले होते. पण पुढे हळूहळू प्लास्टिकचा वापर पुन्हा सुरू झाला आहे. रस्त्यावर अतिक्रमण करून भाजीपाला, फळांची विक्री करणार्‍यांसह इतर साहित्यांची विक्री करणार्‍या विक्रेत्यांचे प्रमाण जास्त आहे.

या विक्रेत्यांकडून पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिकच्या पिशव्या ग्राहकांना देण्यात येत आहेत. मात्र, अशा विक्रेत्यांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत आहे.

पूर्वी कारवाई केली जात होती आता मात्र कोणतीही भीती न बाळगता अनेक विविध भागांमध्ये रस्त्यावर बसणार्‍या विक्रेत्यांकडून सर्रास प्लास्टिक पिशव्यांचा वापर करण्यात येऊ लागला आहे.

प्लास्टिकच्या पिशव्या मिळत असल्याने आता अनेक ग्राहक तर स्वतःकडे कापडी पिशवी असताना देखील भाजी विक्रेत्यांकडे प्लास्टिकच्या पिशवीची मागणी करताना दिसत आहेत.

पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी प्लास्टिकच्या पिशव्या वापरणार्‍यांचे प्रमाणही जास्त दिसत असले तरी त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची परिस्थिती आहे.

जिल्ह्यातील अनेक शहरात तसेच काही गावांमध्ये खुलेआम प्लास्टिकच्या पिशव्यांतून वस्तू दिल्या जात असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.