साकळाईचे भवितव्य अधांतरीच; आमच्या हक्काच्या पाण्याला धक्का लागल्यास कायदेशीर लढा उभारण्याची आमची तयारी

साकळाई उपसा सिंचन योजना विसापूर धरणावरून राबवावी, अशी मागणी घोड लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली आहे. घोड धरणाच्या साठ्यातून पाणी देणे अन्यायकारक ठरेल, असा आक्षेप घेत शेतकऱ्यांनी भविष्यात कायदेशीर लढा उभारण्याचा इशारा दिला आहे.

Updated on -

अहिल्यानगर : राजकिय मुद्दा ठरलेली साकळाई उपसा सिंचन योजना ही विसापूरवरून करणे अधिक सोयीस्कर आहे. घोड लाभक्षेत्रात आधीच पाण्याची कमतरता असल्याने ‘घोड’च्या शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देऊ नये, अशी अपेक्षा ‘घोड’च्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या बैठकीत व्यक्त केली.

श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे घोड लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची बैठक पार पडली. घोड’ लाभक्षेत्र व प्रस्तावित साकळाई उपसा सिंचन योजना या विषयांवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध मान्यवरांनी भूमिका मांडली.

विजय मोकाशी, अनिल पाचपुते, काकासाहेब रोडे, काशिनाथ काळे, शाहू शिपलकर, संदीप औटी, विठ्ठल जंगले, प्रमोद शिंदे आदी उपस्थित होते. साकळाई खालील शेतकरी आपलाच बांधव आहे,

त्यांनाही पाणी मिळाले पाहिजे. मात्र, साकळाईला ओव्हरफ्लोचे पाणी देणार की धरणातून देणार याबाबत जलसंपदा विभागाकडून स्पष्टता मिळणे गरजेचे आहे. घोड लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना उन्हाळी आवर्तनासाठी दरवर्षी रस्त्यावर उतरावे लागत आहे. अशा परिस्थितीत घोड धरणाच्या साठ्यातुन पाणी देण्याचा निर्णय तो ‘घोड’खालील शेतकऱ्यांवर अन्यायकारक ठरेल.

घोड’च्या शेतकऱ्यांच्या पाण्याला धक्का लागणार नाही, याची शास्वती मिळणे गरजेचे आहे. अन्यथा कायदेशीर लढा उभारण्याची आमची तयारी असल्याचे देखील बोलून दाखवले. तसेच घोड धरणावरून उपसा सिंचन योजना करणे संयुक्तिक वाटत नाही. आज साकळाईला ओव्हरफ्लोचे पाणी देण्याचा निर्णय झाला तर भविष्यात एप्रिल-मे महिन्यातही पाणी देण्याचा निर्णय होऊ शकतो, याचा विचार करण्याची गरज आहे.

विसापूर धरणावरून साकळाई योजना करणे अधिक सोयीस्कर असताना व साकळाई लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचीही तशीच मागणी असताना ‘घोड’वरून साकळाईला पाणी देण्याचा निर्णय राजकीय हेतूने प्रेरित वाटतो. अशी शंका देखील उपस्थित करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात सकळाई योजनेवरून चांगलेच राजकारण पेटणार असल्याचे दिसून येत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe