Ahmednagar News : मुलींवरील अत्याचाराच्या अनेक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडलेल्या दिसल्या. आता एक धकाकदायक वृत्त समोर आले आहे. नगर तालुक्यातील एका गावातून बळजबरीने अल्पवयीन मुलीस (वय १७) पळवून नेत गुजरात येथे नेले.
तेथे तिच्यावर बळजबरी करण्यात आली. या मुलीला शोधण्यात नगर तालुका पोलिसांच्या पथकाला यश आले आहे. पोलिसांनी त्या मुलीसह तिला पळवून नेणाऱ्या तरूणाला गुजरात राज्यातील बावला (जि. अहमदाबाद) येथे पकडले.

सागर रमेश मुदळकर (वय २५ रा. बाबुर्डी घुमट ता. नगर) असे आरोपीचे नाव आहे. मुलीच्या जबाबावरून सागर विरोधात अत्याचार, पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला. सागरला पोलिसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी : नगर तालुक्यातील एका गावातून ५ जानेवारी रोजी एका अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून घरातून पळवून नेले होते. तिचा दिवसभर शोध घेऊनही ती मिळून न आल्याने तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण हे करीत होते. तांत्रिक तपासात त्या मुलीसह तरूण गुजरात राज्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी उपनिरीक्षक चव्हाण,
पोलीस अंमलदार राजू खेडकर, संभाजी बोराडे, विक्रांत भालसिंग यांचे पथक गुजरातला गेले. तेथे त्यांनी या दोघांना शोधून ताब्यात घेत नगरला आणले. त्यानंतर पीडित मुलीने दिलेल्या जबाबावरून सागर विरोधात अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.