सरकारने दुधाला पाच रुपयांऐवजी दहा रुपये अनुदान द्यावे; मुख्यमंत्र्यांकडे कर्डिले मांडणार शेतकऱ्यांची बाजू

Pragati
Published:

Ahmednagar news : दूधधंद्याच्या अडचणी, येणारा खर्च व मिळणारे उत्पादन, यातील तफावत पाहता राज्य सरकारने पाच रुपये लिटर प्रमाणे अनुदान जाहीर केले, त्याबद्दल सरकारचे अभिनंदन; परंतु उत्पादन खर्च व मिळणारे उत्पादन, यातील तफावत पाहता व मेटाकुटीला आलेला शेतकरी दूध उत्पादकाला दिलासा द्यायचा असेल तर हे अनुदान पाच रुपयांऐवजी दहा रुपये करणे आवश्यक आहे. आपण स्वतः दूध धंदा केलेला असल्यामुळे मला यातील अडचणी माहिती आहेत, असे मत माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केले.

राज्यातील दूध प्रश्नाबाबत मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीला माजीमंत्री कर्डिले यांना निमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्ह्यातील नगर, राहुरी, पाथर्डी, श्रीगोंदा, कर्जत, नेवासा, पारनेर आदी भागातून अनेक दूधउत्पादक, दूध संकलन केंद्र चालकांनी माजी मंत्री कर्डिले यांची नुकतीच भेट घेऊन अनुदानासासह दूध उत्पादकांच्या समस्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.

यात प्रामुख्याने मागील अनुदान देताना शासनाने अनेक जाचक अटी व शर्ती घातल्यामुळे तसेच ऑनलाइन करताना आलेल्या अडचणींमुळे अनेक शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले. परिणामी दूध उत्पादकांमध्ये सरकार विरोधी रोष निर्माण झाला.

पूर्वीच्या अनुदानावेळी फक्त प्लांटधारकाला चेकर मेकरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यावेळी ती पाच हजार लिटर दूध संकलन असणाऱ्या सर्व केंद्र चालकांना द्यावी तसेच अनुदान देण्याअगोदर पशुवैद्यकीय डॉक्टरांना त्यासंबंधी संपूर्ण ट्रेनिंग द्यावे.

ऑनलाइन नोंदणी करताना संगणकीय तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात, कारण मागच्या वेळी शुन्य ने सुरुवात झालेली बँक खाती किंवा आयएफएससी कोड यांना कोणतेही अनुदान मिळाले नाही, दुधाचे क्वॉलिटी पॅरामीटर ३१/ १ व ८-०- असे करावेत.

दुधाचे किमान दर ३२ रुपये होईपर्यंत सदरचे अनुदान सुलभरीत्या चालू राहावे, अशा व इतर अनेक मागण्या दुध उत्पादक शेतकरी, प्लांटधारक व संकलन केंद्रचालकांनी या वेळी मांडल्या.

त्यावर बोलताना कर्डीले म्हणाले की, आपण नव्याने येणाऱ्या अडचणी व अनुदानासंदर्भात तांत्रिक बाबी लक्षात आणून दिल्यामुळे या बैठकीत आपली बाजू सरकारकडे मी भक्कमपणे मांडणार आहे.

दूध उत्पादकांना योग्य न्याय मिळून देण्यासाठी अनुदानासंदर्भातील सर्व जाचक अटी व शर्ती रद्द करून सुलभरीत्या उत्पादकांना अनुदान मिळावे, यासाठी आपल्याकडून आलेल्या सूचना सरकार समोर मांडून त्याप्रमाणे अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व दुग्धविकासमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे माजी मंत्री कर्डिले यांनी दूध उत्पादक व शेतकऱ्यांसोबत झालेल्या बैठकीप्रसंगी सांगितले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe