Ahmednagar News : नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे महामार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी नारायणगव्हाण ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण कोणताही तोडगा न निघाल्याने चौथ्या दिवशीही सुरूच होते.
महामार्गाचे रुंदीकरण करण्यात यावे, यासाठी ग्रामस्थांनी सातत्यपूर्ण लढा सुरू ठेवत गावाच्या सुरक्षेसाठी प्रशासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवल्या; परंतु अधिकाऱ्यांना कर्तव्याची जाणीव राहिलेली दिसत नाही, गावातील ग्रामस्थ जीव मुठित धरून जगत आहेत.
वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावर चौपदरीकरणही अपुरे पडत आहे. अरुंद रस्त्यामुळे गावात वारंवार अपघात होत आहेत, त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. संबंधित विभागांना निवेदने देऊन व आंदोलने करून सुरक्षेसाठी ग्रामस्थांकडून प्रयत्न होत आहेत परंतु अधिकाऱ्यांना परिस्थितीच गांभिर्य नाही,
यांचा वेळकाढूपणा एक दिवस आमच्या जिवावर बेतेल, अशी भिती ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाली आहे. उपोषणकर्ते सचिन शेळके यांच्यासह ग्रामस्थ भरउन्हात उपोषणास बसले असताना अधिकारी आंदोलनस्थळी यायला तयार नाहीत, निष्क्रिय प्रशासनाच्या नाकर्तेपणाविरोधात ग्रामस्थांनी उपोषणासोबत जलत्याग करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोनस्थळी सरपंच मनिषा जाधव, संपत शेळके, चंद्रकांत कांडेकर, सहादु शेळके, सुनिल भंडारी, सुखदेव शेळके, धोंडीबा गायकवाड, किसन शेळके, बाळकृष्ण शेळके, नितीन बुचुडे, अक्षय शेळके, रामदास चिपाडे, बबन नवले, मंदाकिनी बढे, शाहीदा शेख, जनाबाई पवळे, अनुराधा शेळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.