राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेत मोठ्या प्रमाणावर अपात्र अर्जदारांचा समावेश झाल्याचे आढळल्यानंतर आता महसूल विभाग आणि जिल्हा परिषद यांनी त्याची सखोल पडताळणी सुरू केली आहे. चारचाकी वाहन असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत असल्याने त्यांच्या अर्जांची पुनर्तपासणी केली जाणार आहे.
महिलांची यादी तपासणीसाठी
महसूल विभागाच्या उप प्रादेशिक परिवहन विभागाने जिल्हा परिषदेकडे चारचाकी वाहनधारक महिलांची यादी पाठवली आहे. या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे का? आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळतो आहे का? याचा सखोल तपास केला जाणार आहे. जर त्या योजनेसाठी अपात्र आढळल्या तर त्यांचा लाभ तातडीने बंद केला जाणार आहे.यासोबतच, या महिलांच्या पतींच्या नावावर चारचाकी वाहने आहेत का? हे देखील तपासले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

२१०० रुपये करण्याचे आश्वासन हवेतंच
विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये आर्थिक मदत देण्यात येते. निवडणुकीपूर्वी सरकारने ही रक्कम २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र सध्या ते अद्याप पूर्ण झालेले नाही.
प्रशासनाची कोंडी
निवडणुकीच्या आधी महिलांना जलदगतीने लाभ मिळावा यासाठी अर्जांची तातडीने मंजुरी देण्याचा आदेश प्रशासनाला देण्यात आला होता. त्यामुळे अनेक महिलांना अपात्र असूनही योजनेचा लाभ मिळाला.आता सरकारने या अर्जांची पुन्हा पडताळणी करण्यास सांगितल्याने महसूल आणि जिल्हा प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे. एकाच कामाची जबाबदारी आल्याने प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी वैतागले आहेत.
पुढील टप्प्यात कशाची होणार पडताळणी?
चारचाकी वाहन असलेल्या महिलांचे अर्ज रद्द होतील, त्यांच्या पतींच्या नावावर वाहन असल्यास देखील चौकशी केली जाणार, योजनेस अपात्र असलेल्या महिलांचा लाभ थांबवला जाणार, नवीन लाभार्थींची नोंदणी करताना कठोर निकष लावले जाणार,
महिला लाभार्थींमध्ये चिंता, प्रशासनाला ताण
ह्या योजनेसाठी अर्ज केलेल्या आणि सध्या लाभ घेत असलेल्या महिलांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. जर त्यांच्या नावावर किंवा त्यांच्या कुटुंबातील कोणाच्याही नावावर चारचाकी वाहन असेल, तर त्यांचा लाभ बंद होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, प्रशासनाला पुन्हा अर्जांची तपासणी करण्याचा मोठा बोजा पडला आहे.