१२ फेब्रुवारी २०२५ तांदुळवाडी : मुळा धरणाच्या डाव्या कालव्याला उद्या दि. १३ फेब्रुवारी पासून जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून आवर्तन सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे चेअरमन आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे.उन्हाची तीव्रता वाढल्याने रब्बी हंगामातील गहू, हरभरा, कांदा आदी पिकांना पाण्याची नितांत गरज होती.भुगर्भातील पाणी पातळी घटल्याने शेतकऱ्यांना पिकांना पाणी देणे अवघड झाले होते. त्यामुळे शेतातील उभी पिके पाण्याअभावी सुकू लागली होती.
काही शेतकऱ्यांच्या गव्हाला शेवटच्या पाण्याची गरज होती. तर जोमात आलेला कांदाही पाण्यावाचून आडवा पडला होता. यामुळे या कालव्यावरील राहुरी, टाकळीमियाँ, आरडगाव आदी गावांतील लाभार्थी शेतकऱ्यांनी आ. कर्डिले यांच्याकडे डाव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी केली होती.

त्यामुळे आ. कर्डिले यांनी मंत्री विखे पाटील यांच्याकडे पाटबंधारे विभागाच्या आधिकाऱ्यांना पाणी सोडण्याचे आदेश देण्याची विनंती केली. त्यानुसार उद्या दि. १३ फेब्रुवारी रोजी डाव्या कालव्याचे आवर्तन सुरू होणार आहे.