संरक्षक जाळीमध्ये घुसून बिबट्याने बकरे आणि कोंबड्या केल्या फस्त

अहमदनगर Live24 टीम, 20 जानेवारी 2021 :-जिल्ह्यातील बिबट्याची वाढती दहशत अद्यापही कायम आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर जीवघेणा हल्ला केला आहे.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

त्याचबरोबर बिबट्याने अनेक प्राण्यांवर देखील हल्ले केले आहे. बिबट्याने कालवड, बैल, मेंढ्या शेळ्यांवर हल्ला करून त्यांना ठार केले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसह पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतेच संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील रणखांब येथील एका शेतकर्‍याच्या घराजवळील संरक्षक जाळीमध्ये प्रवेश करुन बिबट्याने तीन बकरे व पंधरा कोंबड्या ठार केल्याची घटना नुकतीच घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, रणखांब गावांतर्गत असलेल्या गुळवेवस्ती येथे सुभाष गुळवे हे शेतकरी राहतात. त्यांनी घरापासून काही अंतरावरच संरक्षक जाळी उभारलेली आहे.

नेहमीप्रमाणे त्यांनी शेळ्या व बकरे जाळीमध्ये सोडली होती. पहाटेच्या सुमारास बिबट्याने जाळीमध्ये घुसून तीन बकरांसह पंधरा कोंबड्या ठार केल्या.

सकाळी शेतकरी गुळवे हे जाळीजवळ गेले असता त्यांना बकरे व कोंबड्या मृतावस्थेत दिसल्या. तत्काळ त्यांनी घटनेची माहिती वन विभागाला दिली.

माहिती मिळताच वन विभागाचे गणपत मुळे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे. या परिसरातील बिबट्याला पकडण्यासाठी येथे पिंजरे लावावेत, अशी मागणी अनेक ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.