शिकार शोधण्यासाठी गेला अन् विहिरीत पडला, वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन करत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढत केले जेरबंद

राहुरीच्या तनपुरेवाडीमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याला वन विभागाने पिंजऱ्यात अडकवून सुरक्षितरीत्या बाहेर काढले. गेल्या १५ दिवसांत बिबट्याच्या हल्ल्यांत पशुधनाची मोठी हानी झाली असून शेतकरी भयभीत आहेत.

Published on -

राहुरी- शहरालगतच्या तनपुरेवाडी शिवारात एका बिबट्याला विहिरीत पडलेल्या अवस्थेतून सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाच्या रेस्क्यू ऑपरेशन टीमला यश मिळाले आहे. भक्ष्याच्या शोधात भटकताना हा बिबट्या बाबासाहेब तनपुरे यांच्या विहिरीत पडला होता.

विशेष म्हणजे, ही मोहीम अवघ्या तासाभरात यशस्वीपणे पार पडली. मंगळवारी रात्री विहिरीत पडलेला हा बिबट्या बुधवारी सकाळी शेतकऱ्यांनी मोटार चालू करण्यासाठी गेल्यावर त्यांच्या नजरेस पडला. वन विभागाला माहिती मिळताच त्यांनी तातडीने पिंजरा विहिरीत सोडला आणि बिबट्याला अलगद त्यात अडकवले. स्थानिकांच्या मदतीने पिंजऱ्यासह बिबट्याला बाहेर काढण्यात आले.

या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. बाजार समितीचे सभापती अण्णा तनपुरे, हर्ष तनपुरे, माजी नगरसेवक मंदा तनपुरे, सचिन तनपुरे यांनीही घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

बिबट्याचा धुमाकूळ

त्याचवेळी, तालुक्यातील निपाणीवडगाव परिसरात बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आहे. बुधवारी रात्री अंधाराचा फायदा घेत एका बिबट्याने लोखंडी जाळीच्या कंपाउंडमध्ये घुसून ज्ञानदेव जगताप यांच्या घराजवळील गोठ्यात तीन बोकड आणि एक गाभण शेळी फस्त केली.

या हल्ल्यात जगताप यांचे ५० ते ६० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले. पहाटे कविता जगताप यांनी गोठा स्वच्छ करण्यासाठी गेल्यावर त्यांना शेळ्या मृतावस्थेत आणि फरशीवर बिबट्याच्या पायांचे ठसे आढळले. हल्ल्यानंतर बिबट्या घरासमोरील शेती महामंडळाच्या जमिनीत पसार झाला.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

गेल्या १५ दिवसांत या परिसरात बिबट्याने दुसऱ्यांदा हल्ला केला असून, यापूर्वी रामकुमार गायकवाड यांच्या तीन गाभण शेळ्या आणि पवार यांच्या शेळनंतर, या घटनेमुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी अशोक बोरुडे, ग्रामपंचायत सदस्या अलका म्हैसमाळे, रविंद्र अंकुश यांच्यासह नागरिकांनी वन विभागाच्या निष्क्रियतेवर संताप व्यक्त केला.

राहुरी परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. शेतकऱ्यांनी वन अधिकाऱ्यांचे अनेकदा लक्ष वेधले, तरीही ठोस कारवाई झालेली नाही. स्थानिकांनी बिबटे पकडण्यासाठी पिंजरे लावण्याची वारंवार मागणी केली, परंतु वन विभागाकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात आहे. अलीकडेच वन विभागाला १३ पिंजरे मिळाले असले, तरी त्यांचा प्रभावी वापर होताना दिसत नाही.
रात्री शेतात आणि दिवसाढवळ्या गावांमध्ये बिबट्यांचे दर्शन आता नित्याचे झाले आहे. या वाढत्या घटनांमुळे शेतकरी भयभीत झाले असून, मानवी हल्ल्यांचे प्रमाणही वाढले आहे. राहुरी परिसरात बिबट्यांनी दोन निष्पाप जणांचा बळी घेतला आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

ठोस उपाययोजनेची गरज

वन विभागाच्या तुटपुंज्या उपाययोजनांमुळे स्थानिकांचा संयम सुटत चालला आहे. बिबट्यांना पकडण्याचे प्रयत्न केविलवाणे ठरत असून, प्रशासनाकडून ठोस पावले उचलली जात नाहीत. शेतकऱ्यांचे पशुधनाचे नुकसान आणि मानवी जीवितहानी वाढत असताना, वन विभागाला अधिक प्रभावी कारवाई करण्याची गरज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News