Ahmednagar News:नगर तालुक्यातील जेऊर येथे रानडुकरांनी केलेल्या हल्ल्यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. यावेळी त्याच्या सोबत असलेल्या कुत्र्यांमुळे त्याचे प्राण वाचले अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
या हल्ल्यात मनोज अजमुद्दीन इनामदार (वय ४५) हे गंभीर जखमी झाले आहेत.याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर परिसरातील बेल्हेकर वस्ती येथे रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घरासमोरील आंब्याच्या बागेमध्ये कुत्रे भुंकत असल्याने मनोज इनामदार हे बघण्यासाठी गेले होते.
त्याचवेळी अचानक त्यांच्यावर रानडुकरांनी हल्ला केला. हल्ल्यात त्यांना खाली पाडून पाठीला तसेच हात व इतर ठिकाणी चावा घेऊन जबर जखमी केले आहे.इनामदार यांच्याकडे तीन पाळीव कुत्रे आहेत.
त्यांनी डुकरांचा प्रतिकार करून डुकरांना पिटाळून लावले. कुत्र्यांमुळेच प्राण वाचले असल्याचे इनामदार यांनी सांगितले. वनविभागाच्या वतीने इनामदार यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.
जेऊर परिसरात गर्भगिरीच्या डोंगररांगांनी रानडुकरांची सर्वात अधिक संख्या आहे. शेतकरी, नागरिक तसेच लहान मुलांची योग्य काळजी घेण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.