अहमदनगर Live24 टीम, 19 जानेवारी 2022 :- जिल्ह्यात कर्जत पाठोपाठ पारनेरची निवडणूकही गाजली आहे. पारनेर नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा सामना असताना बहुमत कोणालाही मिळाले नसून, चुरशीच्या लढतीनंतर तेथील राजकीय स्थिती त्रिशंकू झाली आहे.
राष्ट्रवादीला सात, शिवसेनेला सहा, शहर विकास आघाडीला दोन, भाजप आणि अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे. तिथे आमदार निलेश लंके यांचे वर्चस्व स्थापित झाले असून,
माजी सभापती जयश्री विजय औटी व स्वाती निलेश खोडदे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. असं असलं तरी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार असा दावा राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके केला आहे.
निकालानंतर बोलताना आमदार लंके म्हणाले की, पारनेर नगरपंचायतीत शिवसेनेची दीर्घकाळ सत्ता होती. हे विजय औटी यांचे गाव आहे. आम्हाला शून्यातून सुरुवात करायची होती.
विधानसभा निवडणुकीतही पारनेर शहरातून आपल्याला कमी मते मिळाली होती. निकालात त्रिशंकू अवस्था दिसत असली तरी ही वरवरची स्थिती आहे. प्रत्यक्षात नगराध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार आहे.
आता नगरपंचायतीला मिळालेल्या जागा पाहिल्या तर आम्ही त्यात बऱ्यापैकी यशस्वी झालो आहोत, असंही लंके म्हणाले आहे. पारनेर मध्ये राष्ट्रवादीचे आमदार लंके आणि शिवसेनेचे माजी आमदार विजय औटी यांच्यात यासाठी चुरस होती.
विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील राजकारण फिरले असून लंके यांच्यासाठी अनुकूल स्थिती आहे. त्यामुळे पारनेर शहरात काय होते, याकडे लक्ष लागले असून औटी यांनी राष्ट्रवादीला चांगलीच लढत दिली आहे.
लंके आमदार झाल्यानंतर त्यांनी शिवसेना फोडली असून, नगरसेवकांचाच राष्ट्रवादीत प्रवेश घडवून आणला होता. पण वरिष्ठ पातळीवर याची दखल घेण्यात आली.
त्यामुळे लंके यांना थेट मातोश्रीवर जाऊन या नगरसेवकांना पुन्हा शिवसेनेकडे सोपवावे लागले होते. निलेश लंके यांची ही चाल त्यावेळी नगरपंचायत निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच असल्याचे बोलले जात होते.
मधल्या काळात लंके आणि औटी यांच्यात अनेक संघर्षाचे प्रसंगही घडून गेले. शिवसेनेच्या एका गटाकडूनही औटी यांना विरोध झाला. या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीत काय होणार, याकडे लक्ष लागले होते.
निवडणूक एकतर्फी होऊन राष्ट्रवादीची सत्ता येईल, असं लंके यांच्या समर्थकांना वाटत होतं. प्रत्यक्षात औटी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने चांगलीच लढत दिली.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम