अहमदनगर शहरातून एक मोठी बातमी आली आहे. नगर शहरातील कासीम खान मशिदीमधील चोरीचा उलगडा पोलिसांनी केला आहे. यात संभाजीनगर मधील एक अल्पवयीन मुलगा ताब्यात घेतला आहे.
तपासात समोर आलेली माहिती पाहून पोलिसही थक्क झाले. आरोपीने नातेवाईकांकडून पैसे घेऊन शेअरमार्केटमध्ये गुंतवले होते. गुंतवलेले पैसे बुडाल्याने त्याने हे मोठे धाडस केले.

अधिक माहिती अशी : कासीम खान मशिदीत २८ नोव्हेंबरला चोरी झाली होती. मशिदीमधील कार्यालयातील कपाट फोडून 77 हजार रुपये लांबवले. त्यानंतर मुश्ताक अब्बास पठाण (वय ५०, रा. मुकुंदनगर) यांनी पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली.
तपासाचे मोठे आवाहन
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आपल्या पथकासह थेथे धाव घेतली. मशिदीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची वायर आगोदरच कट केल्याने तेथे काही खास मिळाले नाही.
मशिदीच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही कॅमेरे पाहून पोलिसांनी पूरक माहिती ताब्यात घेतली. धागेदोरे हाती लागताच पोलिसांचे तपास पथक छत्रपती संभाजीनगर येथे रवाना झाले. तेथून अल्पवयीन मुलास ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली देत चोरीची रक्कम पोलिसांना काढून दिली.
शेअर मार्केटमधील गुंतवणूक नडली
आरोपीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी नातेवाईकांकडून पैसे घेतले होते. परंतु त्याचे पैसे बुडाले. नातेवाईकांना त्यांचे पैसे देण्यासाठी त्याने मशिदीत डल्ला मारला असल्याचे समोर आले.