माळीवाडा परिसरातील एका शाळेची धोकादायक भिंत महानगरपालिकेने हटवली

Published on -

अहिल्यानगर – महानगरपालिका प्रशासनाने धोकादायक व मोडकळीस आलेल्या जुन्या इमारती, वस्तूंची पाहणी सुरू केली आहे. ज्यांच्या इमारती, बांधकामे जुनी आहेत, ३० वर्षांपेक्षा अधिक जुने बांधकाम असेल, अशांनी त्यांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. महानगरपालिका लवकरच धोकादायक इमारतींवर कारवाई सुरू करणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

माळीवाडा परिसरातील एका शाळेची धोकादायक भिंत महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने बुधवारी उतरवून घेतली. याची माहिती देताना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी शहरातील धोकादायक इमारतींची तपासणी सुरू केल्याचे सांगितले. महानगरपालिका शहरातील मोडकळीस आलेल्या व अर्धवट पडलेल्या इमारतींचा सर्वे करून धोकादायक स्थितीत असलेल्या इमारतींना नोटिसा बजावते.

मात्र, अनेक ठिकाणी घरमालक व भाडेकरू वादात या इमारती रिकाम्या केल्या जात नाहीत. शासनाच्या निर्देशानुसार ३० वर्षांपेक्षा जुने बांधकाम असणाऱ्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात एखादी दुर्घटना टाळण्यासाठी जुन्या इमारत मालकांनी आपल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे. महानगरपालिकेने तपासणी सुरू केली आहे.

माळीवाडा परिसरातील एका शाळेची भिंत धोकादायक अवस्थेत होती. ती पडून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना किंवा शाळेतील मुलांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत ही भिंत हटवण्यात आली आहे. शहरातील इतर धोकादायक इमारतींवर कारवाई करण्यात येणार आहे, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe