श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील खुनाचे रहस्य उलगडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. पत्नी व भावानेच खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले.
या प्रकरणी मनोज किशोर गोसावी (वय ३६), सौरभ मनोज गोसावी व अनिता बाबासाहेब उर्फ गणेश गोसावी (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेतआरोपींना श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शिवारात एका अनोळखी इसमाचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला होता. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे तोंड जाळण्यात आले होते.
ही घटना २५ सप्टेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३०२, २०१ प्रमाणे खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वेगाने फिरवला.
मृत बेवारस इसम हा सुकेवाडी येथील असल्याचे निष्पन्न झाले. यावरुन मयत बाबासाहेब गोसावी यांची पत्नी अनिता व भाऊ मनोज यांची पोलिसांनी चौकशी केली. दोघांकडील माहितीमध्ये विसंगती आढळून आल्या.
मयताचा भाऊ मनोज गोसावी याची सखोल चौकशी पोलिसांनी केली. चौकशीअंती मयत बाबासाहेब उर्फ गणेश किशोर गोसावी यास दारु पिण्याचे व्यसन होते. तो दारु पिवून आई-वडिलांना मारहाण करत असे. २४ सप्टेंबर २०२३ रोजी मयत बाबासाहेब गोसावी हा दारु पिवून त्रास देवू लागला.
मयताचा भाऊ, वहिनी अनिता व चुलत भाऊ सौरभ यांनी बाबासाहेब याला दवाखान्यात जायचे, असे म्हणून स्वीफ्ट गाडीत बसवले. रस्त्याने जाताना बाबासाहेबचा गळा आवळल्याने तो मृत्यूमुखी पावला.
नंतर नगर-दौंड रोडवरील रेल्वे ट्रॅकजवळ त्याचा मृतदेह टाकण्यात आला. ओळख पटू नये म्हणून मयताच्या तोंडावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची कबुली मनोज किशोर गोसावी, सौरभ मनोज गोसावी व अनिता बाबासाहेब उर्फ गणेश गोसावी यांनी दिल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले.