Ahmednagar News : श्रीरामपूर तालुक्यातील एकलहरे शासकीय वाळू केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या चार ते पाच गावांतील गरजू लोकांना विशेषतः शासनाच्या योजनेअंतर्गत घरकुल, शासकीय व इतर कामासाठी एकलहरे केंद्रातून माफक दरात वाळू मिळणार असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
तालुक्यातील एकलहरे येथे शासकीय वाळू केंद्राचे काल मंगळवारी मंत्री विखेंच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण झाले. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी राज्य सरकारने घेतलेला धाडसी निर्णय व त्याची अंमलबजावणी मंत्री विखे पाटील यांनी संपूर्ण जिल्ह्यातील विशेषतः श्रीरामपूर तालुक्यात तात्काळ केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद नवले यांनी शासन निर्णयाचे कौतुक केले.
यावेळी ना. विखे म्हणाले की, बेकायदेशीर वाळू उत्खनातून महाराष्ट्रात वाळू माफियांचे साम्राज्य निर्माण झाले होते. अवैध वाळू विक्री वाढली होती. पर्यावरणाची हानी होत होती. यातून शासनाचाही कोट्यवधींचा महसूल बुडत होता.
यामुळे शासनाने सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात वाळू उपलब्ध करुन देण्याकरीता वाळूचे उत्खनन, साठवणूक व विक्री ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्याचा निर्णय घेतला. या पुढील काळात वाळू ऑनलाईन पध्दतीने लाभार्थ्यांच्या दारात अल्प दरात पोहोच होणार आहे.
तसेच भविष्यात या यंत्रणेत आणखी मोठा बदल करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. शासकीय वाळू विक्री केंद्र उभारण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील महसूल अधिकारी यांचे फार मोठे कष्ट आहे. भविष्यातही ते टिकून राहतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी वाळू केंद्राची माहिती देऊन या केंद्रातील कायदेशीर वाळू साठा उपलब्ध होऊन तो कायदेशीर मार्गाने लाभार्थ्यांना देण्याचे काम संबंधित ठेकेदारांनी करावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य इंद्रभान थोरात, बेलापूरचे उपसरपंच अभिषेक खंडागळे, इस्माईल शेख, उक्कलगावच्या सरपंच रविना शिंदे, भाजपच्या महिला तालुकाध्यक्ष मंजुश्री ढोकचौळे, अनिल थोरात,
एकलहरे सेवा संस्थेचे चेअरमन अन्सार शेख, लालमोहमद जहागीरदार यांची भाषणे झाली. शेवटी कॉन्ट्रॅक्टर सचिन यादव यांनी आभार मानले.