राज्यासाठी पुढचे ४८ तास धोक्याचे ! ह्या ठिकाणी अतिवृष्टीचे संकट !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 28 सप्टेंबर 2021 :-  बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले ‘गुलाब’ चक्रीवादळ निवळले असून, त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विविध भागांत मुसळधार ते अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे.

राज्यात पुढील ४८ तासांत गुलाब चक्रिवादळाच्या राहीलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव दिसणार आहे. तसेच येत्या २४ तासात मराठवाडा,मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतीमुसळधार आणि अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

आज कोल्हापूर आणि सांगली हे दोन जिल्हे वगळता राज्यात सर्वत्र मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज पुण्यासह अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ आणि गडचिरोली या सात जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

तर चंद्रपुराला रेड अलर्ट देण्यात आला असून उर्वरित महाराष्ट्रात येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील काही तासात संबंधित जिल्ह्यांत मेघगर्जनेसह वेगवान वाऱ्याच्या साथीने धुव्वाधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान याठिकाणी 30 ते 40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

‘गुलाब’ चक्रीवादळ रविवारी आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकले होते. त्यानंतर चक्रीवादळाची तीव्रता कमी झाली. मात्र, या काळात किनारपट्टीच्या भागाला त्याने तडाखा दिला.

सोमवारी चक्रीवादळ निवळले आणि त्याचे रूपांतर आता तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र सध्या छत्तीसगड आणि ओडिसाच्या दक्षिणेला आहे. त्यानंतर ३० सप्टेंबरला हे कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात प्रवेश करणार असून, अरबी समुद्रात त्याची तीव्रता पुन्हा वाढून नवे चक्रीवादळ तयार होण्याचा अंदाज आहे.

अरबी समुद्रात नवे चक्रीवादळ तयार झाल्यास त्याचे नाव ‘शाहीन’ असणार आहे. गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून पुढील तीन दिवस राज्यातील हवामान झपाट्याने बदल घडत आहेत.

त्यामुळे कोकण किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुढील तीन दिवस पर्यटकांनी किंवा मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News