महिला कर्मचाऱ्यानी तक्रार केलेल्या ‘त्या’ मनपा कर्मचाऱ्याची उचलबांगडी

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- महिला कर्मचार्‍यांच्या तक्रारींवर चौकशी करून महिला तक्रार निवार समितीने मनपा कर्मचारी मेहेर लहारे यांची अखेर बदली करण्यात आली आहे.

त्यांच्या जागी स्वतंत्र सहायक आयुक्त सचिन राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लहारे यांच्याबाबत मध्यंतरी काही महिला कर्मचार्‍यांनी तक्रारी केल्या होत्या.

दैनंदिन काम करत असताना लहारे महिला कर्मचार्‍यांकडून अपेक्षा व्यक्त करतात, असा गंभीर आरोप त्यात होता. या तक्रारीनुसार सहा महिन्यापूर्वी महिला तक्रार निवारण समितीचे एक पथक चौकशीसाठी आले होते.

त्यावेळी संबंधित अधिकार्‍याने मोबाईलवरून पाठविलेले संदेश पुरावा म्हणून सादर करण्यात आला होता. शिवाय समितीने केलेल्या चौकशीत अन्य काही बाबी पुढे आल्या होत्या.

त्यानुसार 31 डिसेंबरला काढलेल्या आदेशानुसार लहारे यांची आस्थापना विभागातून प्रभारी नगरसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या पदावर असलेले एस. बी. तडवी यांची बदली सामान्य प्रशासन विभागात केली आहे. तसेच सहायक आयुक्त सचिन राऊत यांची बदली आस्थापना विभाग प्रमुख म्हणून करण्यात आली आहे.