भोग इथले संपत नाहीत ! अहमदनगरमधील ३३३ गावांत स्मशानभुमीस जागाच नाही, उघड्यावर अंत्यसंस्कार, पहा सद्यस्थिती

देशात कितीही प्रगतीच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी अद्यापही अहमदनगर जिल्ह्यासारख्या जिल्ह्यात अनेक गावांत स्मशानभुमीची सोय देखील नसल्याचे वास्तव आहे.

Ahmednagarlive24 office
Published:
smashanabhumi

Ahmednagar News : देशात कितीही प्रगतीच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी अद्यापही अहमदनगर जिल्ह्यासारख्या जिल्ह्यात अनेक गावांत स्मशानभुमीची सोय देखील नसल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील ३३३ गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागाच उपलब्ध होत नसल्याने या गावांमध्ये उघड्यावर अथवा माळरानावर अंत्यसंस्कार होतात हे वास्तव आहे.

मृत्यूनंतरही इथले भोग संपत नसल्याचे जणू हे वास्तव चित्र आहे. जिल्ह्यात १ हजार ३२२ ग्रामपंचायत असून १ हजार ५२५ स्मशानभूमी आहे. त्यापैकी १ हजार १९२ गावांमध्ये स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध आहे.

अर्थात काही गावांत दोन किंवा तीन स्मशानभूमी आहेत. मात्र स्मशानभूमीसाठी जागा नसल्याने उघड्यावर, नदीकाठी किंवा माळरानावर अंत्यसंस्कार करण्याची नामुष्की ३३३ गावांवर आली आहे.

जनसुविधा निधीतून स्मशानभूमीसाठी कमी निधी प्राप्त झाल्याने आता निधी पुनर्नियोजनातून स्मशानभूमी नसलेल्या गावांसाठी निधी मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या जनसुविधांतर्गत स्मशानभूमीसाठी निधी उपलब्ध होता. मात्र आमदार, खासदार हे स्मशानभूमीऐवजी स्मशानभूमींशी आनुषंगिक कामे देत ठेकेदारांना पोसण्यात धन्यता मानतात.

जिल्ह्यातील ३३३ गावात स्मशानभूमीच उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे नातेवाइकांना उन्हाळा व पावसाळ्यात त्रासाचा सामना करावा लागतो. मृत्यू हे अंतिम सत्य आहे.

जन्माला आलेल्या माणसाला मृत्यू हे ठरलेलाच आहे. जीवन जगताना माणसाला संघर्ष करावा लागतो, मात्र, स्मशानभूमी नसलेल्या गावात मरणानंतरही भोग संपत नसल्याचे चित्र आहे.

तालुकानिहाय स्मशानभूमीसाठी जागा नसलेल्या गावांची संख्या
अकोले – ६, जामखेड ११, कर्जत ८३, कोपरगाव – ६६, नगर १०, नेवासा १९, पारनेर – ४९, पाथर्डी-२८, संगमनेर- २१ शेवगाव-२०, राहाता – १६, राहुरी- ४

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe