शेतकऱ्यांबाबत कारखानदारांची ‘यूज अँड थ्रो’ची भूमिका!

Ahmednagarlive24 office
Published:

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2021 :- शेतकऱ्यांना मारू नका. ऊस उत्पादकांना एकच भाव द्या. दराबाबत दुजाभाव करू नका. कायद्यानुसार साखर कारखाने भाव देत नसतील तर कारवाई करा.

कारखाना टिकवायचा शेतकऱ्यांनी आणि लुटायचं कारभाऱ्यांनी हे खपवून घेणार नाही. ज्यांना साखर कारखाना योग्य भाव देऊन चालवता येत नसेल त्यांनी बंद करावा. कारखाना चालवायला पैसे आहेत,मात्र शेतकऱ्यांना द्यायला नाहीत. सहकाराच्या पंढरीमध्ये शेतकऱ्यांची अशी अवस्था दुर्दैवी आहे.

शेतकऱ्यांच्या बाबतीत साखर कारखानदार यूज अँड थ्रोची भूमिका बजावत आहे. अशी अत्यंत तीव्र शब्दांत शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शेतकऱ्यांना मिळणाऱ्या ऊसदरासंदर्भात शेतकरी संघटना आणि जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे प्रतिनिधींची प्रादेशिक सहसंचालकांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक घेण्यात आली.

यावेळी ते बोलत होते. ही बैठक तब्बल चार तास सुरू होती. या बैठकीत शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या लुटीबद्दल चांगलेच ताशेरे ओढले. तसेच वजनमापे निरीक्षक आणि साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींच्या अनपुस्थितीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली.

शेतकऱ्यांना त्याच्या उसाचे वजन खाजगी काट्यावर करू देण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली मात्र ती मान्य करण्यात आली नाही. दरम्यान या बैठकीत बोलताना शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे म्हणाले, साखर कारखानदारच विधान मंडळात सदस्य आहेत.

तेच कायदे करतात आणि त्यांच्या सोयीचे कायदे करतात. कारखान्यात उत्पादित केल्या जाणाऱ्या सर्वच उत्पादनाचा अंतर्भाव आरसीएफमध्ये व्हावा. ऊसदर अधिनियमात दुरुस्ती होणे गरजेचे आहे. त्यामुळे तांत्रिक बाबींचा अभ्यास करून शेतकऱ्यांची फसगत थांबवावी लागेल. असे मत व्यक्त केले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe