Ahilyanagar News : शहिद जवान संदिप गायकर यांनी देशाच्या सेवेसाठी केलेले बलिदान व्यर्थ जाणार नाही. त्यांना आलेले वीरमरण हे भारत मातेच्या चरणी समर्पित झाली आहे. या घटनेचे दु:खअसले तरी, त्यांच्या धैर्याची प्रेरणा सातत्याने मिळत राहावी यासाठी ब्राम्हणवाडा येथे शहिद स्मारक उभारण्याची घोषणा जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शहिद जवान संदिप गायकर यांच्यावर ब्राम्हणवाडा येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. लष्करी इतमामात अखेरचा निरोर देण्यासाठी ब्राम्हणवाडा येथे हजारो नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी संदिप गायकर यांच्या पार्थिवाचे दर्शन घेवून पुष्पचक्र अर्पण केले.

आ.डॉ.किरण लहामटे, आ.अमोल खताळ, मा.आ.वैभव पिचड, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, मा.खासदार सदाशिव लोखंडे यांच्यासह जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, लष्कराचे आधिकारी, सेवानिवृत्त सैनिक आणि विविध संस्थाचे पदाधिकारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपली श्रध्दांजली अर्पण करताना पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, अतिरेक्यांशी लढताना या जिल्ह्याचे भूमीपुत्र संदिप गायकर यांना आलेले विरमरण हे भारत मातेच्या चरणी समर्पित झाले आहे. अतिशय सामान्य परिस्थितीतून पुढे येत संदिप यांनी देश सेवेसाठी सैन्यदलात जाण्याचा निर्णय केला.
जम्मु कश्मिरमध्ये अतिरेक्यांशी लढताना त्यांना आपले प्राण गमवावे लागले. या घटनेचे दु:ख खुप मोठे आहे. परंतू तेवढा अभिमान सुध्दा असल्याचे नमुद करुन, मंत्री विखे पाटील यांनी ब्राम्हणवाडा येथे संदिप गायकर यांच्या स्मरणार्थ शहिद स्मारक उभारणार असल्याचे सांगितले.
मंत्री विखे पाटील यांनी गायकर कुटूंबियांची भेट घेवून त्यांना दिलासा दिला. संदिप गायकर यांचे वडील आणि पत्नी यांच्याशी संवाद साधत त्यांनी आम्ही सर्वजन आपल्या समवेत असल्याचे सांगितले.