Shirdi News : देशभरातील साईमंदिरे उभारणीचा निर्णय साईबाबा संस्थानने तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…

Ahmednagarlive24 office
Published:
Shirdi News

Shirdi News : देशभरातील साईमंदिरे उभारणीचा निर्णय साईबाबा संस्थानने तातडीने मागे घ्यावा, अन्यथा येत्या ५ ऑक्टोबरपासून साईमंदिर परीसरात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्षा अनिताताई जगताप व माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांना दिला आहे.

शिर्डी नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा अनिताताई जगताप व माजी उपनगराध्यक्ष विजय जगताप यांनी साईबाबा संस्थानला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, साईबाबा संस्थानने देशभर साईमंदिर उभारणीसाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे.

साई संस्थानला एखाद्या राज्याने किंवा संस्थेने पाच एकर जागा दिल्यास संस्थान तेथे शिर्डीसारखे मंदिर उभारणार, तेथे अन्नदान, रुग्णसेवा आदी उपक्रमही राबवणार, किंवा मंदिर बांधण्यासाठी ५० लाखांपर्यंत मदत करणार आहे.

यासह साई मंदिराची असोसिएशन काढण्यासारखे अन्य काही निर्णय विचाराधीन असल्याचे साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांनी नुकतेच जाहीर केले आहे.

वास्तविक साईबाबा संस्थानला आपला इथला कारभार सांभाळतानाच तारेवरची कसरत करावी लागते. रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. महाविद्यालये अद्याप सुरळीत झालेले नाहीत. अनेक भाषेतील ग्रंथही अनेकदा आपल्याला भाविकांना पुरवता येत नाही.

लेझर शो, साई गार्डनच्या घोषणा ऐकून एक पिढी संपली, पण त्यावर साईसंस्थानने काहीही केले नाही. कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनेक वर्षांत सोडवता आले नाही. साईबाबा संस्थान प्रशासनाला शिर्डी येथील कामकाजावर नियंत्रण ठेवणे अवघड जात असताना बाहेर आणखी पसारा वाढविण्याचा विचारात असल्याचे ऐकून आमचर्य वाटले.

प्रशासन अनेकदा आमचा बाहेर काही संबंध नसल्याचे सांगते. मग आता बाहेर मंदिरे कसे उभारणार? असा प्रश्न आहे. देशातील कोणत्याही देवस्थानने आपली इतरत्र शाखा काढल्याचे ऐकिवात नाही. संस्थान मात्र हा अभिनव उपक्रम राबवत आहे.

संस्थान आपल्या वेबसाईटवरून संगणक, शटल आदीसाठी इतकेच काय तर उत्सवातील मंदिर सजावटीसाठी देणगी मागते. उच्च न्यायालय नियुक्त तदर्थ समितीसारखी जबाबदार व्यक्तींची समिती बेजजबाबदारपणे तुगलकी निर्णय घेते, याचे आश्चर्य वाटते.

साई संस्थानने तातडीने हे निर्णय मागे घ्यावेत, अन्यथा आम्ही ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजेपासून श्री साईबाबा मंदिर परिसर येथे आमरण उपोषणास बसणार आहोत, असा इशारा जगताप यांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe