वाळूतस्कर अन महसूलच्या पथकाचा नदीपात्रातच रंगला थरार ; ९ कर्मचारी जखमी

Ahmednagarlive24 office
Published:

Ahmednagar News : जिल्ह्यातील नदीकाठच्या भागातील अनेक गावातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा केला जात आहे. जर या वाळू उपशाला विरोध केला तर त्यास दमबाजी तसेच प्रसंगी मारहाण देखील करण्यात येते.

त्यामुळे सहसा वाळू उपशा बाबत कोणी बोलत नाहीत. परंतु आता अवैध वाळूउपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावरच हल्ला करत अनेक कर्मचाऱ्यांना लाकडी दांडक्याने, लोखंडी गजाने मारहाण करीत शासकीय वाहनांची तोडफोड केली.

हि घटना श्रीगोंदा तालुक्यातील चवरसांगवी या गावात घडली. विशेष म्हणजे हा हल्ला करण्यात पोलिस पाटलाच्या मुलाचा देखील सहभाग आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, श्रीगोंदा तालुक्याच्या तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांना तालुक्यातील चवरसांगवी गावाच्या शिवारात काहीजण अवैधरित्या वाळू उपसा करत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यानुसार तहसीलदार डॉ. क्षितिजा वाघमारे यांच्या सूचनेनुसार तलाठी शाहरुख रशीद सय्यद यांच्यासह ८ कर्मचाऱ्यांचे पथक कारवाईसाठी पाठविले असता, त्यांना जेसीबीच्या साहाय्याने दोन डंपरमध्ये वाळू भरुन वाहतूक सुरू असल्याचे दिसले.

पथकातील कर्मचाऱ्यांनी या वाहनांवर कारवाई सुरू केली. हि कारवाई करत असताना, तेथे तिघेजण आले. त्यापैकी एकाने ‘माझे नाव सागर सुदाम बोरुडे असून, मी पोलिस पाटलाचा मुलगा आहे.

तुम्हाला काय करायचे ते करा, मी गाड्या घेऊन जाणार’ असे म्हणत एक टिपर पथकाच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न करीत तो पळवून नेला. त्यानंतर पथकाने तहसीलदार डॉ. वाघमारे यांना पोलिस संरक्षण मागितले.

पोलिसांची वाट पाहत असताना, रात्री ८ वाजेच्या सुमारास सागर बोरुडे व इतर १२ ते १४ जणांनी लाकडी दांडके व लोखंडी गजाने कर्मचाऱ्यांवर हल्ला केला. त्यामुळे कर्मचारी शेजारच्या पिकांत व आजूबाजूला असलेल्या खड्यात लपून बसले, अंधारात कर्मचारी दिसत नसल्याने हल्लेखोरांनी शासकीय वाहनाची (एमएच १६ सीक्यू ३२६९) तोडफोड केली.

या हल्ल्यात तलाठी शाहरुख रशीद सय्यद यांच्यासह मिलिंद पोपटराव जाधव, भारत महादेव चौधरी, अनिल शंकर कुंदेकर, कृष्णा उद्धव गुजर, संदीप भिवा चाकणे, महेंद्र मालन काळे, ऋषीकेश लक्ष्मण खताळ, गणपत मुरलीधर झाडे हे गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी बनपिंप्रीचे तलाठी शाहरुख रशीद सय्यद (वय ३०) यांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सागर सुदाम बोरुडे (रा. घोगरगाव) याच्यासह १३-१४ अनोळखी वाळू तस्करांवर गुन्हा करण्यात आला आहे.

 

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe