Ahilyanagar News : सध्या बारावीच्या परीक्षा सुरू असून त्या शेवटच्या टप्यात आहेत. यंदा जिल्हा प्रशासनाने मात्र कॉपीमुक्त परीक्षा पार पाडण्याचा विडाच उचलला आहे. त्यामुळे मात्र अनेकांच्या अशा अपेक्षा धुळीस मिळाल्या आहेत. मात्र तरीदेखील अनेकजण कॉपी करत असल्याचे समोर आले असून यात जिल्ह्यातील महसूलचे कर्मचारी देखील सहभागी असल्याचे नुकत्याच घउलेल्या प्रकारातून समोर आले आहे.
बारावीची परीक्षा देत असलेल्या मुलाला कॉपी देण्याच्या उद्देशाने परीक्षा केेंदात आलेल्या नायब तहसीलदारावर श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी तालुक्यातील तनपुरवाडी येथील संत भगवानबाबा माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर येवुन मुलाला बारावीच्या परीक्षेत कॉपी पुरविण्याच्या उद्देशाने येत नायब तहसीलदार अनिल तोरडमल जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध केंद्र संचालक शिवाजी दळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शिवाजी दळे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव गुट्टे हे तनपुरवाडीच्या बारावीच्या परीक्षा केंद्रावर आले असता त्यांनी दळे यांना समोर बसलेला व त्याच्या गळ्यात महाराष्ट्र शासन असे नावाने ओळखपत्र असलेला व्यक्ती कोण आहे अशी विचारणा केली. त्यावेळी त्याने त्याचे नाव अनिल तोरडमल असल्याचे सांगितले.
११ फेब्रुवारी २०२५ व २७ फेब्रुवारी २०२५ रोजी बारावीचे पेपर सुरु असताना अनिल तोरडमल येथे केंद्रवरच थांबुन होता. त्याने शासकिय नेमणुक नसताना मुलाला कॉपी देण्याच्या उद्देशाने केंद्रावर येवुन जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे. तसेच महाराष्ट्र विद्यापीठाच्यामंडळाच्या व इतर विनीर्दिष्ट परीक्षेमध्ये होणाऱ्या गैरप्रकार प्रतिबंधक अधिनियम१९८२ मधील कलम ७ प्रमाणे नियमाचे उल्लंघन केले आहे. अशी तक्रार दळे यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अनिल तोरडमल याला ताब्यात घेतले आहे.
दरम्यान सामाजिक कार्यकर्ते यांनी परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदार थांबलेला आहे व तेथे कॉपीसारखा गैरप्रकार सुरु असल्याची तक्रार केल्यानंतर सहाय्यक पोलिसनिरीक्षक महादेव गुट्टे तेथे आले. त्यांनी तपासणी केल्यानंतर अनिल तोरडमलचे सर्व भांडे फुटले. नायब तहसीलदारच अशा प्रकारात सहभागी असल्याने महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील याकडे डोळेझाक केली आहे का याची चौकशी होण्याची गरज आहे.
नायब तहसीलदार अनिल तोरडमल केंद्रावर येवुन रासरोसपणे बसलेले असताना शिक्षण विभाग, महसुल विभागाचे वरीष्ठ अधिकारी येथे येवुन गेले मग त्यांनी या व्यक्ती विरु्दध कारवाई का केली नाही. महसूल विभागाचे वरीष्ठ अधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांच्या कोणाच्याच लक्षात ही गोष्ट कशी आली नाही. याची देखील चौकशी झाली पाहीजे. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजच्या आधारे ही कारवाई केली जावी अशी सामान्य पालकांची मागणी आहे.