कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात येत्या २४ तासांत अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातही पुढील ४८ तासांत घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या परिसरातही हवामानशास्त्र विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे.
समुद्रसपाटीवरील किनाऱ्यालगत असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते उत्तर केरळपर्यंत आहे. त्यामुळे १८ जुलै रोजी कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुढील दोन दिवस रत्नागिरीसह सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातही जोरदार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासांत पुणे, सातारा जिल्ह्यातील घाट विभागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या. त्यामुळे कोयना परिसरात २० मिमी, ताम्हिणी घाटमाथ्यावर १५ मिमी, तर डुंगरवाडी येथे २१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
मात्र पुढील दोन दिवस घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात १८ ते २१ जुलैदरम्यान वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम सरी पडणार आहेत. तर विदर्भातील तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने यलो अलर्ट देण्यात आला आहे.