यंदा राज्यात समाधानकारक पाऊस पडणार, बाराशे वर्षांपासून चालत आलेल्या बाल भैरवनाथ मंदिराचा कौल

Published on -

चांदेकसारे : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे गावात असलेल्या बाल भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी मंदिराने यंदा महाराष्ट्रात चांगला पाऊस पडेल आणि अन्नधान्य मुबलक पिकेल, तसेच वर्षभरात अनेकांच्या मनोकामना पूर्ण होतील, असा कौल दिला आहे.

या मंदिरात गेल्या बाराशे वर्षांपासून गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाच्या सुरुवातीला पावसाचे प्रमाण, आर्थिक स्थिती आणि रोगराई यांसारख्या गोष्टींचे भाकीत वर्तवण्याची परंपरा आहे.

ही प्रथा आजही चांदेकसारे गावकऱ्यांनी जपून ठेवली आहे. गुढीपाडव्याला नवीन वर्षाच्या मुहूर्तावर ग्रामस्थ आणि पुरोहित एकत्र येऊन पर्जन्यमान नक्षत्र तपासणीचा कार्यक्रम पार पाडतात.

गुढीपाडव्याच्या एक दिवस आधी रात्री भैरवनाथ मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या आवारात गावकरी आणि पुरोहित मिळून अठरा नक्षत्रांचे खड्डे खणतात. हे खड्डे गाडग्यासारखे असतात. या खड्ड्यांमध्ये वडाची पाने ठेवून त्यात सप्तधान्य आणि पाणी भरले जाते. रात्रभर हे खड्डे झाकून ठेवले जातात.

दुसऱ्या दिवशी म्हणजे गुढीपाडव्याला सकाळी बाल भैरवनाथ आणि माता जोगेश्वरीची विधिवत पूजा होते. ही पूजा पुरोहित आणि पंचक्रोशीतील यजमानांच्या हस्ते केली जाते.

त्यानंतर यंदा पावसाचे प्रमाण कसे असेल, हे सांगितले जाते. पुरोहित उमेश जोशी गुरु यांच्या हस्ते नक्षत्र खड्ड्यांची पूजा झाल्यानंतर १८ नक्षत्रांवरून पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.

खड्ड्यांमध्ये वडाच्या पानांवर जर जास्त पाणी शिल्लक राहिले, तर त्या नक्षत्रात चांगला पाऊस पडेल; जिथे मध्यम पाणी राहील, तिथे मध्यम पाऊस; आणि ज्या खड्ड्यात पाणीच राहणार नाही, ते नक्षत्र कोरडे राहील, असा अंदाज लावला जातो. जयद्रथ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी रात्री या खड्ड्यांची तयारी करून ठेवली होती.

यंदाचा कौल असा आहे : अश्विनी नक्षत्रात मध्यम पाऊस, भरणी नक्षत्रात चांगला पाऊस, कल्याणी कृतिका नक्षत्रात भरपूर पाऊस, रोहिणी नक्षत्रात कमी पाऊस, मृग नक्षत्रात चांगला पाऊस, आर्द्रा आणि पुनर्वसू नक्षत्रात भरपूर पाऊस, पुष्य नक्षत्रात मध्यम पाऊस, आश्लेषा नक्षत्रात जेमतेम पाऊस, मघा आणि पूर्वा नक्षत्रातही जेमतेम पाऊस, तर उत्तरा, हस्त आणि चित्रा नक्षत्रात चांगला पाऊस, स्वाती, विशाखा, अनुराधा आणि ज्येष्ठा नक्षत्रातही चांगल्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe